३१ डिसेंबरची रात्र मोठय़ा उत्साहात साजरी करणाऱ्या ठाणेकर तरुणांनी मंगळवारी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सकाळही फटाके फोडून ऐकमेकांना शुभेच्छा देत मोठय़ा जल्लोशात साजरी केली. दरवर्षीप्रणाणे यंदाही ठाण्यातील राम मारुती रोड तरुणांच्या या जल्लोशात ‘हाऊसफुल्ल’ झाला होता. यावेळी बदलत जाणाऱ्या काळात नवीन पिढीने आजही सांस्कृतिक वारसा जपला असल्याचे प्रकर्षांने जाणवले. या दिवशी शहरातील तरुण मोठय़ा संख्येने राम मारुती रोडवर जमले होते. बऱ्याच काळानंतर भेटलेल्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या तरुणांच्या घोळक्यांनी वातावरण फुलून गेले होते. सकाळी ७ वाजल्या पासूनच तरुणांनी आपल्या मित्र मैत्रिणींसह येथे जमण्यास सुरुवात केली होती. ९ वाजेपर्यंत हा रस्ता पुर्णत: भरुन गेला होता. जमलेल्या गर्दीस आवरताना उपस्थित पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी कुलकॅम्प आईसक्रीम पार्लर जवळ जमलेल्या तौबा गर्दीतून वाहनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी पोलीसांना सक्तीने सर्वाना बाजूला करावे लागत होते.
यावेळी ऐकमेकांना आलिंगन देत दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्वजण दिसत होते. काही तरुणांनी आपल्या गाडय़ांना विविध रंगाचे फुगे लावून वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. दिवळीच्या काही दिवस आधी खरेदी केलेले नवीनवीन कपडे परिधान करुन सर्वजण येथे जमले होते. काही तरुणींनी नववारी साडी तर तरुणांनी धोतर-सदरा परिधान करुन मराठी अस्मितेचे दर्शन घडविले.