रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर विदर्भाला प्राधान्य देण्यात आले नाही त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची परवनागी हवी असेल तर मुंबईला जा अन्यथा, कार्यक्रम करता येणार नाही, असे सांगून विदर्भातील कलावंत आणि सांस्कृतिक संस्थांना पोलीस दलाकडून परवानगी नाकारली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत उपराजधानीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठय़ा प्रमाणात वाढलेली असताना अनेक स्थानिक कलावंतांना अशा कार्यक्रमांमधून संधी दिली जाते. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले की, सभागृहाचे बुकिंग करण्याआधी संबंधित संस्थेला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यांच्या प्रमाणपत्रानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी दिली जाते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आघाडी सरकारच्या काळातील समिती बरखास्त केल्यावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नवीन ३४ सदस्यांची समिती जाहीर केली आहे. यात प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याची गरज असताना यावेळी विदर्भाला डावलून मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि साताराला ते देण्यात आले.
साधारणत सांस्कृतिक कार्यक्रमांना किंवा नाटय़संहितांची परवानगी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ाला स्थान दिले जाते. आतापर्यंत विदर्भात तीन सदस्य होते त्यामुळे उपराजधानीसह विदर्भातील कलावंतांना कधीच अडचणी आल्या नाहीत. मात्र, यावेळी समितीत विदर्भातून एकही सदस्य नसल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगी घेण्यासाठी मुंबईला जा, असे पोलीस दलाकडून सांगितले जात आहे. यापूर्वी अजय गंपावार, जॉनी मेश्राम आणि सतीश पावडे हे सदस्य होते. त्यापूर्वी प्रभाकर दुपारे, संजय भाकरे आणि दिलीप ठाणेकर होते. परिनिरीक्षण मंडळाची यादी जाहीर केल्यानंतर जुन्या सदस्यांना परवानगी देण्याचा अधिकार नसल्यामुळे ते पत्र देऊ शकत नाही. त्यामुळे कलावंतांना केवळ परवानगीसाठी आणि पत्र घेण्यासाठी मुंबई-पुण्याशिवाय जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कलावंतांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शंभर रुपये भरल्यानंतर संबंधित सदस्य परवनागी देत असतो. मात्र, शंभर रुपये भरण्यासाठी आणि परवानगीसाठी हजार रुपये खर्च करावे लागणार का, असा प्रश्न अनेक कलावंतांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे माजी सदस्य अजय गंपावार म्हणाले, विदर्भातील किमान तीन ते चार सदस्यांना समितीत स्थान न दिल्यास कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना त्रास होईल. विदर्भात सांस्कृतिक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे प्रत्येक वेळी मुंबई-पुण्याला जाणे शक्य होणार नसल्याने कलावंतांवर हा अन्याय आहे. माजी सदस्य संजय भाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून कलावंत आणि सांस्कृतिक संस्थांना होणारा त्रास बघता राज्य सरकारने समिती बरखास्त करून विदर्भातील कलावंतांना स्थान द्यावे, अशी मागणी केली.