जवळपास दहा वर्षांपासून केवळ स्वप्नातीत राहिलेला ‘गोदा पार्क’ हा राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी प्रकल्प अतिशय अनोख्या पद्धतीने वास्तवात येणार हे आता स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या कारणांस्तव अर्धवट अवस्थेत राहिलेला आणि त्यामुळे विरोधकांकडून कायम टिकेचे लक्ष्य ठरलेला हा १३.५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प विनामूल्य देखभाल, दुरूस्ती आणि विकसित करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनला देण्याचा निर्णय गुरूवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. गुजरातमधील जामनगरच्या धर्तीवर हा प्रकल्प साकारण्याची तयारी फाऊंडेशनने दाखविली आहे. त्यामुळे गोदा काठावर साकारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ नाशिकच नव्हे तर, महाराष्ट्रातील एक आकर्षणाचे केंद्र ठरू शकेल.
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत जादा विषयात हा विषय मांडण्यात आला होता. राज ठाकरे हे शिवसेनेत असताना आणि शिवसेनेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना गोदा पार्कची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने या प्रकल्पाचे काहीअंशी काम केले. परंतु तो अनेक अडचणींमुळे पुढे सरकू शकला नाही. या पाश्र्वभूमीवर, रिलायन्स फाऊंडेशनतर्फे ‘गोदा पार्क’ विकसित करण्याबाबत दिलेल्या पत्राच्या आधारे हा विषय सभेत मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षांनी त्यास विरोध दर्शविला नाही. नाशिकच्या विकासाला आमचा कोणताही विरोध राहणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले असले तरी या पक्षाच्या नेत्यांकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च फाऊंडेशन उचलणार आहे. प्रारंभी अर्धा किलोमीटरचे क्षेत्र विकसित करून त्यावर महापालिकेकडून येणाऱ्या अभिप्रायावर पुढील कामकाज करण्याची तयारी फाऊंडेशनने दर्शविली आहे. प्रकल्पातील संपूर्ण क्षेत्र विकसित झाल्यानंतर नागरिकांनाही तो विनामूल्य स्वरूपात उपलब्ध राहील, असे महापौर अ‍ॅड. वाघ यांनी नमूद केले.
मूळ आराखडय़ानुसार गोदा पार्क हा अहिल्यादेवी पूल ते गंगापूर गाव असा नाशिकच्या बाजूने १३. ५ किलोमीटर लांबीचा तर पंचवटीकडील बाजू आठ किलोमीटरची आहे. महापालिकेने आजवर कोटय़वधी रूपये खर्च करून २२०० मीटरचे क्षेत्र विकसित केले आहे. नव्या प्रस्तावानुसार एक किलोमीटर क्षेत्राच्या विकासाला साधारणत: ७ ते ८ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च फाऊंडेशन करणार असल्याचे सभेत सांगण्यात आले. हा प्रकल्प थेट नांदूरमानूपर्यंत नेण्यात यावा, अशी सूचना केली. या प्रकल्पात ज्या ज्या नाविण्यपूर्ण संकल्पना मांडल्या गेल्या होत्या, त्या पूर्णत्वाच्या दिशेने विलंबाने का होईना पाऊल पडू लागल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

असा असेल गोदापार्क
* लेसर शो
* संगीत कारंजे
* रोप वे
* बहुउद्देशीय सभागृह
* दुर्मिळ फुलांचा बगीचा
* वृक्षराजीवर लक्ष
* जल क्रीडा (वॉटर पार्क)
* योगासनासाठी खास व्यवस्था
* विशाल वाहनतळ
* पादचाऱ्यांसाठी काही अंतरावर पूल
* उंच टेकडय़ावर टेहेळणी व्यवस्था
* वनौषधींची लागवड
* उपहारगृह