नदीपात्रातील पाणवेली काढण्याच्या कामास महापालिकेने स्थगिती दिल्यामुळे अडीच महिन्यांपासून पाणवेलींच्या वेढय़ात अडकलेल्या गोदावरीची दक्षता अभियानच्या पुढाकारामुळे अखेर या जंजाळातुन सुटका झाली आहे. होळकर पूल ते आनंदवल्लीपर्यंतच्या गोदा पात्रातील पाणवेली पाण्यावरील घंटागाडीच्या सहाय्याने काढण्यासाठी अभियानचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक विक्रांत मते यांनी प्रयत्न केले. त्याची परिणती आज गोदापात्र स्वच्छ होण्यात झाली असून आगामी सिंहस्थात नदीपात्र स्वच्छ राहील याची नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नाशिक शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरीला पाणवेलीची समस्या गेल्या काही वर्षांपासून भेडसावत आहे. नदीपात्रावर सर्वदूर पसरणाऱ्या पाणवेलींमुळे ही गोदावरी नदी आहे की, हिरवळीचे मैदान असा प्रश्न पडतो. पाणवेलींमुळे प्रदुषणात भर पडत असल्याने गोदावरी स्वच्छ राखण्यासाठी नगरसेवक मते यांनी तीन वर्षांपूर्वी निर्माल्य संकलन बोट अर्थात पाण्यावरील घंटागाडीची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून गोदावरी स्वच्छ होण्यास सुरुवात झाली. सातत्याने हा उपक्रम राबविला जात असल्याने या काळात गोदावरी पाणवेलीमुक्त झाली. परंतु, ही बाब महापालिकेला बहुदा पटली नाही. मागील डिसेंबर महिन्यात पालिकेने निर्माल्य संकलन बोटीच्या उपक्रमास स्थगिती दिली. यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पाणवेलींचा वेढा पडला. तीन महिन्यात पाणवेली अशा काही फोफावल्या की हे गोदावरी पात्र आहे की नाही, असा प्रश्न पडावा. पाणवेलींची वेगाने वाढ होत असल्याने नगरसेवक मते यांनी दक्षता अभियानच्या सदस्यांसह महिनाभरापूर्वी पुन्हा गोदावरीची स्वच्छता मोहीम हाती घेतली. अहिल्यादेवी पूल ते आनंदवल्लीपर्यंतचे गोदापात्र पुन्हा एकदा स्वच्छ करण्यास सुरुवात झाली. सलग महिनाभर चाललेल्या या उपक्रमामुळे सध्या गोदावरी पात्राने मोकळा श्वास घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गोदावरीच्या प्रदुषणावरून ओरड होत असताना गोदावरी पाणवेलीच्या कचाटय़ात सापडणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक, गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाणवेलींना फोफावण्यास पोषक स्थिती निर्माण होते. गोदापात्राची स्वच्छता राखण्याच्या जबाबदारीचा पालिकेला विसर पडला. काही वर्षांपूर्वी पाणवेलीच्या समस्येचे निदान करण्यासाठी पालिका पर्याय शोधत होती. चर्चासत्र व कागदी घोडे नाचविण्याच्या पलीकडे काहीही पर्याय उपलब्ध होत नव्हते. तेव्हा मते यांनी पाण्यावरील घंटागाडीचा प्रयोग प्रथम स्व खर्चाने राबविला होता. सावरकरनगर बोट क्लब परिसरातील गोदापात्राची स्वच्छता करून पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महापालिकेने अहिल्यादेवी होळकर पूल ते आनंदवल्लीपर्यंत बोटीने स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरू झाला. तीन महिन्यांपूर्वी पालिकेने त्यास स्थगिती दिल्यामुळे गोदावरी पुन्हा पाणवेलीच्या जंजाळात सापडली. यामुळे दक्षता अभियानने गोदावरीची पुन्हा स्वच्छता केली आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असणारी गोदावरी स्वच्छ ठेवणे नाशिककरांचे कर्तव्य आहे. गोदापात्र स्वच्छतेत सातत्य रहावे या दृष्टीकोनातून पाण्यावरील घंटागाडीची योजना खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मते यांनी केले आहे.