गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणताही उपक्रम राबविला तरी तो हाणून पाडण्याचा चंग शहरातील काही नागरिकांनी बांधल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. नदीवरील पूल आणि नागरिकांची वस्ती असणाऱ्या भागातून गोदापात्रात निर्माल्य वा कचरा फेकला जाऊ नये याकरिता महापालिका ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या बसवत आहे. या उपक्रमामुळे काही ठिकाणी नदीपात्र स्वच्छ दिसू लागले असतानाच दुसरीकडे काठालगतच्या नागरिकांनी या जाळ्या तोडून पात्रात कचरा फेकण्याचे नवे उद्योग सुरू केले आहेत. प्रतिबंध करूनही नदीकाठावर कपडे वा गाडी धुणे, दंडात्मक कारवाईलाही न जुमानणे, ठिकठिकाणी कलश असूनही पात्रात निर्माल्य व कचरा फेकणे असे प्रकार अव्याहतपणे सुरू राहिल्यास गोदावरीची प्रदुषणाच्या जोखडातून मुक्तता होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ, साधु-महंत, हरित लवाद आणि न्यायालय अशा अनेक घटकांचा महापालिकेवर दबाव वाढला आहे. प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरीचे पाणी आचमन करण्याचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देत नदीचे पाणी प्रदुषित राहिल्यास सिंहस्थ कुंभमेळा न भरविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडणाऱ्या महापालिकांना लगाम लावण्यासाठी महापौर व आयुक्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. महापालिकेची सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची पुरेशी क्षमता नाही. काही ठिकाणी गटारीचे पाणी थेट गोदापात्रात सोडले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनि:स्सारण केंद्रांची संख्या वाढविण्यावर सध्या लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
प्रदूषणास हातभार लावणाऱ्या पाणवेली पाण्यातील घंटागाडीमुळे हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे. निर्माल्य व कचरा पात्रात टाकला जाऊ नये म्हणून अनेक ठिकाणी निर्माल्य कलश बसविण्यात आले. परंतु, त्याचा वापर अपवादाने होतो. प्रतिबंध करूनही नागरीक जमेल त्या ठिकाणाहून पात्रात निर्माल्य व कचरा भिरकावत असतात. ही बाब लक्षात आल्यावर घारपुरे घाट व इंद्रप्रस्थलगतच्या पुलावर लोखंडी जाळी बसविण्यात आली. यासारखीच व्यवस्था सुंदर नारायण मंदिर ते घारपूरे घाटा लगतच्या काठावरही करण्यात आली आहे. पुलांवर ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यावर काही दिवसात त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. म्हणजे पात्रात ज्या ठिकाणी कधी प्रतिबिंब दिसत नव्हते, तिथे आसपासच्या मंदिरांचे प्रतिबिंब पहावयास मिळू लागले. तथापि, कचरा टाकणारे घटक लोखंडी जाळ्यांनाही जुमानेसे झाले आहेत. सुंदर नारायण मंदिर ते घारपूरे घाट परिसरातील काही लोखंडी जाळ्या तोडून कचरा टाकण्याचा उद्योग बिनदिक्कतपणे सुरू आहे.
काठावरील गोदा उद्यानालगत ज्या विशिष्ट ठिकाणी कचरा टाकला जातो, तिथे अशी जाळी बसवून हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, स्थानिकांनी जाळ्या तोडून गोदावरी दूषित ठेवण्याचा अट्टाहास चालविला आहे. याआधी नदीपात्रावर कपडे धुणे वा मोटारी धुणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्या कारवाईला स्थानिकांनी जुमानले नाही. स्थानिकांची ही कार्यशैली कायम राहिल्यास गोदावरी प्रदुषणुक्त होणे दिवास्वप्न ठरण्याची भीती आहे.