08 August 2020

News Flash

गोदा स्वच्छतेसाठी सर्वाची एकजूट

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरित कुंभ संकल्पनेंतर्गत शुक्रवारी शहर परिसरातील नदीकाठावर राबविण्यात

| June 6, 2015 07:04 am

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरित कुंभ संकल्पनेंतर्गत शुक्रवारी शहर परिसरातील नदीकाठावर राबविण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानाची ही वैशिष्टय़े ठरली. वरिष्ठ शासकीय अधिकारी, महंत ग्यानदास महाराज, भय्युजी महाराज यांच्यासह साधू-महंत, १२५हून अधिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी अशा तब्बल २० हजार स्वच्छता दूतांनी सहभाग नोंदवत शेकडो टन कचरा संकलित करत स्वच्छतेचा नवीन अध्याय लिहिला. परंतु, अभियानापासून सर्वसामान्य नागरिक काही अंतर राखून राहिल्याचे प्रकर्षांने पाहावयास मिळाले.
कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिशय व्यापक स्वरूपात राबविलेल्या या अभियानाने गणेशोत्सवात विसर्जित करण्याऐवजी मूर्ती दान उपक्रमाची आठवण करून दिली. परंतु, तेव्हा प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती दान करणाऱ्यांनी स्वच्छतेच्या उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदविला नाही. गोदावरी काठ, कपिला, वाघाडी, नासर्डी या नदीकाठच्या परिसरासह बसस्थानके, बाजार समिती, घाट, पूल, रस्ते व प्रमुख चौक अशी जवळपास ६९ ठिकाणे पालिकेने निश्चित केली होती. प्रत्येक ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी सहभागी गटांवर आधीच सोपविली गेली होती. यामुळे सकाळी सातच्या सुमारास बहुतांश ठिकाणी शासकीय, पालिका, जिल्हा परिषद आदींचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व काही विद्यार्थी हजर झाले. कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा न करता प्रत्येकाने आपापल्या परीने काम सुरू केले. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते आयटीआय पुलाजवळ नासर्डी नदीकाठावर तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फिल्ट्रेशन प्लांट ते दोंदे पूल दरम्यानच्या मोहिमेचा शुभारंभ केला. तत्पूर्वी, सर्वाना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
अभियानात वेगवेगळे रंग पहायला मिळाले. ठिकठिकाणी शेकडो शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले असताना त्यांच्याकडे साधनांचा प्रचंड तुटवडा होता. खराटा, फावडे, पाटी हे साहित्य संबंधितांनी संस्थेतून आणले होते. पण, त्यांची संख्या कमी असल्याने संथ गतीने काम करणे भाग पडले. प्रशासनाने खराटेही पुरवले नसल्याची तक्रार अनेकांनी केली. मविप्र शिक्षण संस्थेतील शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांवर ‘गोदा पार्क’वरील स्वच्छतेची जबाबदारी होती. परिसराची स्वच्छता करत ठिकठिकाणी कचरा संकलित करण्यात आला. काही उत्साही मंडळींनी तो जागेवर पेटवून देण्यास मागेपुढे पाहिले नाही. मोहिमेत यंत्रणेला उन्हाळी सुटीमुळे विद्यार्थ्यांचे पाठबळ फारसे मिळाले नाही. यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागले. काही शाळांमध्ये नववी व दहावीचे विशेष वर्ग घेतले जातात. त्या विद्यार्थ्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. शासकीय रोपवाटिकेबाहेर होली मदर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी स्वच्छता करत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका स्वीकारली. रामकुंड, यशवंतराव महाराज पटांगण व परिसराची जबाबदारी विविध शाळांच्या शिक्षक, आरोग्य शाळेचे कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. हे काम झाल्यावर संबंधितांची हजेरी नोंदवली जाणार होती. यामुळे काहींचा कल हजेरी नोंदवून गायब होण्याकडे राहिला. निव्वळ ‘फोटोसेशन’ करणाऱ्यांची कमतरता नव्हती. अतिशय स्वच्छ कपडय़ात आलेले बिल्डर असोसिएशन, काही शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आदींनी खराटा हाती धरून छायाचित्र काढून घेण्यात धन्यता मानली. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोदकेश्वर समोरील पात्राची अतिशय उत्साहात स्वच्छता करत होते. त्यात नाशिक केंब्रिज स्कूलचे शिक्षकही सहभागी झाले. टाळकुटेश्वर येथील पात्राची जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात आली. महंत ग्यानदास महाराज, भय्युजी महाराज आदी साधू-महंतांनी मोहिमेत सहभाग नोंदवत गोदावरीचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले.
कुठे दरुगधीयुक्त जागेत मनापासून चाललेली स्वच्छता तर कुठे नदीपात्रालगत उभे राहून टापटीप कपडय़ात चाललेले निव्वळ ‘फोटोसेशन’ ..सिंहस्थ म्हणजे नेमके काय याची कल्पना नसलेल्या विद्यार्थ्यांनी दाखविलेली उत्स्फूर्तता तर कुठे संकलित कचरा पेटवून लावलेली विल्हेवाट.. एकाच वेळी शेकडो हात पुढे आले असताना साधनांचा भासलेला तुटवडा.. स्वच्छता करण्याऐवजी काहींची हजेरी लावण्यासाठी चाललेली धडपड.. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शहरवासीयांचा मिळालेला अल्प प्रतिसाद..
प्रतिबंधात्मक उपायांवर भर
गोदावरीच्या स्वच्छतेला अभियानाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप मिळाले आहे. पुढील काळात गोदावरी प्रदूषित होणार नाही याची दक्षता शहरवासीय व भाविकांनी घेण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल.
एकनाथ डौले (विभागीय महसूल आयुक्त)
कायमस्वरुपी तोडग्यासाठी प्रयत्न
गोदावरीसह देशातील धार्मिक स्थळी असणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणाचा विषय आपण संसदेत मांडला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. नदीचा प्रवाह आणि सांडपाणी याची स्वतंत्र वेगळी व्यवस्था करायला हवी. देशभरातील भाविक सिंहस्थांत गोदावरीत स्नान करण्यासाठी येणार आहेत. यामुळे नदीची स्वच्छता राखणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.
खा. हेमंत गोडसे
भाविकांनी पात्रात निर्माल्य टाकू नये
भारतीय संस्कृतीत नदीला आई मानले जाते. यामुळे गोदावरीची सेवा प्रत्येकाने करायला हवी. एका दिवसाच्या अभियानामुळे नदी स्वच्छ होणार नाही. त्यामुळे सिंहस्थानंतरही आपल्यासह सूर्योदय परिवाराचे सदस्य नदीपात्राची सेवा अर्थात स्वच्छता करण्यासाठी येणार आहोत. भाविकांनी पूजा विधी केल्यानंतर निर्माल्य व इतर साहित्य नदीपात्रात टाकू नये. यंत्रणांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
भय्यूजी महाराज
तन-मन-धनाने सहभागी व्हा
व्यापक स्वरूपात राबविलेले गोदावरी स्वच्छता अभियान स्वागतार्ह आहे. आजपर्यंत कोणी शासकीय अधिकाऱ्यांनी असे अभियान राबविले नव्हते. गोदा स्वच्छतेची सुरुवात या निमित्ताने झाली असून ती नियमितपणे होणे आवश्यक आहे. नागरिकांनी मोहिमेत तन-मन-धनाने सहभाग नोंदवावा.
महंत ग्यानदास महाराज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 7:04 am

Web Title: godavari sanitation
टॅग Kumbhmela
Next Stories
1 ‘डोंगर हिरवागार’ करण्यासाठी नाशिककरांचा प्रतिसाद
2 अ.भा. मराठी नाटय़ परिषदेच्या पुरस्कारांवर नाशिकचा ठसा
3 लैंगिक अत्याचारांविषयी कारखान्यांमध्ये सर्वेक्षण
Just Now!
X