पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे जलपूजन एकाच दिवशी दोन वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले! बंधारा परभणीत व जलपूजन बीड जिल्ह्यात, याविरुद्ध शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेनंतर पवारांनी परभणीच्या हद्दीत येऊन जलपूजन केले.
ढालेगावला गोदावरी नदीवर बंधारा बांधला आहे. याचा लाभ पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. नदीचे एक पात्र परभणीत, तर दुसरे बीडमध्ये येते. त्यामुळे जलपूजनाचा वाद उद्भवला. बंधारा परभणीच्या हद्दीत असताना जलपूजन मात्र माजलगाव तालुक्यातील सोमठाणा गावच्या हद्दीत ठेवले होते. माजी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी आयोजिलेल्या जलपूजन कार्यक्रमास पवार आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या निषेधार्थ शिवसेनेने बंधाऱ्याच्या परभणीतील हद्दीत समांतर जलपूजनाचा निर्धार केला होता. त्यानुसार शनिवारी सकाळीच आमदार मीरा रेंगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसनिकांनी नदीच्या अलीकडील तिरावर जलपूजनाची तयारी केली. दुपारी बाराच्या दरम्यान नदीच्या पलीकडील तिरावर पवार यांच्या उपस्थितीत जलपूजन सुरू झाले. याच वेळी अलीकडल्या तिरावरून शिवसनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी ही घोषणाबाजी थांबवली, तसेच जलपूजनाचे साहित्य ताब्यात घेतले. याच वेळी आमदार रेंगे यांनी पवारांच्या कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांना जलपूजन चुकीच्या ठिकाणी होत असल्याची जाणीव करून दिली. त्यावर पवारांनी आपल्याला जागेच्या हद्दीबाबत माहिती नव्हती. या ठिकाणी जलपूजन झाले असले, तरी परभणीच्या हद्दीत आपण जलपूजन करू, असे सांगितले. सोमठाण्याचा कार्यक्रम आटोपताच लगेच परभणीच्या हद्दीत येऊन पुन्हा एकदा बंधाऱ्याचे जलपूजन केले. उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, कल्याणराव रेंगे, मुंजाजी कोल्हे, राहुल पाटील, सुरेश ढगे, दत्ता कांबळे, रावसाहेब निकम आदी उपस्थित होते.