मराठवाडय़ाच्या विविध भागात खासगी व शासकीय गोदामे फोडून मालमोटारीतून मालवाहतूक करून आंध्र प्रदेशात हा माल विक्री करणारी टोळी परभणी पोलिसांनी उघडकीस आणली. या टोळीकडून गहू, साखर व कापसाच्या गाठी असा १३ लाखांचा माल जप्त करून आंध्रातील तीन खरेदीदार व्यापारी व मालमोटार मालकास अटक करण्यात आली. सर्व आरोपींना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
गेल्या महिनाभरात परभणी जिल्ह्य़ात गोदामामधील माल चोरीच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वीच पडगाव शिवारातील गोदामातून ४५ कापसाच्या गाठी व ९० क्विंटल गहू चोरीस गेला. काही दिवसांपूर्वी बोरीत सरकारी गोदामातून गव्हाची चोरी करताना सहायक निरीक्षक आर. बी. सानप व सहकाऱ्यांनी गव्हासह मालमोटार पकडली. या वेळी ८ हमालांना ताब्यात घेण्यात आले. परंतु मालमोटारीचा चालक व मालक शेख रऊफ शेख कादर (नांदेड) याच्यासह तीन जण पसार झाले.
अटकेतील हमालांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आंध्रातील म्हैसा येथे पथक रवाना झाले. म्हैसा येथील खरेदीदार म. लतीफोद्दीन म. फयाजोद्दीन, स. जब्बार, सय युसूफ, स. युसूफ स. शब्बीर या तिघांना अटक करून चोरीस गेलेला गोदामातील माल जप्त केला. यात ४५ कापसाच्या गाठी, ९० क्विंटल गहू मुखेड येथून चोरी केलेली ९० क्विंटल साखर जप्त केली. दरम्यान, मालमोटारमालक व चालक शेख रऊफ यास नांदेडहून ताब्यात घेण्यात आले.