मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाच रात्री चार महिलांना स्वतंत्र प्रकरणात सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचे सोने जप्त करण्यात आले. यापैकी तीन महिलांनी अंर्तवस्त्रात तर एकीने बेल्टमध्ये हे सोने दडविलेले होते.
मुंबईत सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून तस्करांमध्ये महिलांचाही सहभाग वाढला आहे. हवाई गुप्तचर विभागाने एकाच रात्री केलेल्या कारवाईत चार महिलांना सोन्याची तस्करी करताना अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ८६ लाख रुपये किंमतीचे सात किलो सोने जप्त करण्यात आले आहे. यापैकी तीन महिला या सिंगापूरहून आलेल्या होत्या.
 मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. सलमा बेगम, मोनालिसा नायर आणि नूर जहान या तीन महिला तीन वेगवेगळ्या विमानातून बँकॉकहून मुंबईत आल्या होत्या. या तिघींनी आपापल्या अंतर्वस्त्रात सोने दडवून आणले होते. प्रत्येकीने दोन सोन्याचे बार दडवले होते. तर वर्षां नावाच्या महिलेने बेल्टमध्ये पाच किलो सोने दडविले होते. त्याची किंमत १ कोटी ५१ लाख रुपये आहे.
या चारही महिलांकडून एकूण सुमारे ७ किलो सोने जप्त केले असून त्याची किंमत १ कोटी ८६ लाख रुपये असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी दिली. चालू महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच २५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. तर एप्रिल महिन्यात विक्रमी ८७ किलो सोने जप्त करण्यात आले होते असे लांजेवार यांनी सांगितले.