नवी दिल्लीत झालेल्या, राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताकदिन शिबिरातील ‘बेस्ट कॅडेट’ स्पर्धेत अहमदनगर कॉलेजचा छात्र प्रेम कोळपकर याने सुवर्णपदक पटकावून, महाराष्ट्र संचलनालयाला सलग सहाव्यांदा मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. एनसीसीच्या वरिष्ठ गटात ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’चा बहुमान कॉलेजला व १६ महाराष्ट्रीय बटालियनलाही सलग दुसऱ्या वर्षी प्राप्त झाला.
महाराष्ट्र संचलनालयाला मिळालेला मानाचा पंतप्रधान बॅनर व चषकही अहमदनगर कॉलेजचीच छात्र शिवानी पारखी हिने, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते स्वीकारला. कॉलेजच्या तीन छात्रांची यंदा शिबिरासाठी निवड झाली होती. प्रेम कोळपकर कला शाखेचा प्रथम वर्षांचा, शिवानी अकरावी शास्त्र शाखेची, तर सहभागी झालेला तिसरा छात्र लिजो जोसेफ हा वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षांचा विद्यार्थी आहे. सलग दुसऱ्या वर्षी असा बहुमान मिळवणारे अहमदनगर कॉलेज एकमेव ठरले आहे.
विविध परीक्षांच्या आधारावर प्रेम कोळपकरला ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’चा बहुमान देण्यात आला. तो १७ महाराष्ट्र बटालियनचा कॅडेट आहे. त्याला कमांड अधिकारी कर्नल मारवा, कर्नल आर. एस. खत्री, कॉलेजचे एनसीसी प्रमुख मेजर डॉ. श्याम खरात यांचे मार्गदर्शन लाभले. बी. पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे सचिव फिलीप बार्नबस, कॉलेजचे प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, संचलनालयाचे उपमहानिदेशक ब्रिगेडिअर आर. एस. अग्रवाल आदींनी प्रेमचे अभिनंदन केले.