शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आसनगाव आणि शेणवे येथे आतापर्यंत चार महिलांना सोन्याचे दागिने चकचकीत करून देतो, असे सांगून पाच ते सात लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. 

सूट, बूट, टाय लावून दोन तरुण मोटार सायकलवरून शहापूर तालुक्यातील एखाद्या गावात घरोघरी जाऊन घरामध्ये कोणी पुरुष तर नाही ना याची खात्री करुन गोड बोलून घरातील महिलांना प्रथम ते आपल्या जवळील सोन्याच्या दागिन्यांवर रसायन टाकून सोने चकचकीत होत असल्याचे दाखवतात आणि घरातील सर्व दागिने ते पुढय़ात आणण्यास सांगतात. दागिने चकचकीत करून करुन दिल्यानंतर रीतसर पैसे घेऊन ते निघून जातात. अशा रीतीने विश्वास संपादन केल्यानंतर त्याच गावातील पुढच्या घरात सोन्याचे दागिने चकचकीत करून देण्याच्या बहाण्याने महिलांना बोलण्यात गुंगवून खरे दागिने हात चलाखीने ते स्वत:च्या पिशवीत लपवतात. रसायनाचा भांडय़ात फेस करून त्यामध्ये सोन्याचे दागिने टाकले असल्याचे भासवून ते भांडे प्रेशर कुकरमध्ये वीस मिनिटे ठेवण्यास सांगतात. दोन शिट्टय़ा झाल्यानंतर तुम्ही कुकरमधून दागिने काढून घ्या. ते स्वच्छ झाले असतील असा मौलिक सल्ला देऊन घाईने ते निघून जातात. कुकरच्या शिट्टय़ा झाल्यानंतर कुकरमधून सोन्याचे दागिने असलेले भांडे काढले तर त्यामध्ये दागिनेच दिसत नाहीत. अशी या चोरांची गुन्ह्य़ाची पद्धत आहे. शेणवे येथे गेल्या आठवडय़ात यशवंत व रवींद्र सोनावळे यांच्या कुटुंबीयांना, आसनगाव येथे वंदना व प्रचीती बोंबे या सासू-सुनांना फसवण्यात आले आहे. किन्हवली, शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. भांगरे तपास करीत आहेत.