संघ कार्यालय परिसरातील क्रांतीकारक स्मृती संवर्धन संस्थेचे गणेशोत्सव मंडळ आजही पारंपरिकपणे गणेशोत्सव साजरा करीत आहे.
या मंडळाबाबत बोलताना मुकुल खोत म्हणाले, क्रांतीकारक स्मृती संस्थेची स्थापना १९६५ मध्ये सुधाकर वाचासुंदर, बंडू लोखंडे, बबन यादव, विलास मुंडले, लखु तारे या मंडळींनी केल्यानंतर मंडळाशी अनेक कार्यकर्ते जुळले. सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून मंडळाकडे बघितले जात होते. १९९०पर्यंत गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत वादविवाद, परिसंवाद कार्यक्रम आयोजित केले जात होते. गेल्या सात-आठ वर्षांत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला असलेल्या सुरक्षेमुळे कार्यक्रमांवर बंधन आले. संघ कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविली. ज्या ठिकाणी मैदान होते त्या ठिकाणी सुरक्षा भिंत टाकण्यात आली त्यामुळे आम्हाला कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा मिळत नसल्यामुळे कार्यक्रम करणे शक्य नाही. संस्थेचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षे असून अनेक कार्यक्रम करण्याचा मानस असला तरी जागेअभावी ते करू शकत नाही. क्रांतीकाररांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने देशभक्तीपर कार्यक्रम मंडळातर्फे केले जात होते. शिवाय कीर्तन, प्रवचन आणि विद्यार्थ्यांंच्या विविध स्पर्धाचे आयोजन केले जात होते. आज मात्र केवळ स्पर्धा घेतल्या जात असून परिसरातील मुले त्यात सहभागी होत असतात. सामाजिक उपक्रमात रक्तदान, आरोग्य तपसाणी, नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. गोहत्या बंदी हा विषय मंडळाने हाती घेतला असून त्याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. नागपुरातील अनेक नावाजलेल्या नाटय़ संस्थांची  नाटके गणेशोत्सवात सादर होत असताना त्या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत होता. याशिवाय नकला, जादूचे प्रयोग आणि अनेक जुने चित्रपट गणेशोत्सवात दाखविले जात होते. आता सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कमी झाली असली गणपतीची प्रतिष्ठापना करून परिसरातील मुलांसाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते. शिस्तप्रिय मंडळ म्हणून संस्थेककडे बघितले जाते.