सुप्रसिद्ध उद्योगपती व खासदार राहुल बजाज यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल करणाऱ्या येथील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
१९६२ मध्ये कमलनयन बजाज यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या महाविद्यालयाची गणना देशातील अव्वल महाविद्यालयात केली जाते. नॅकने देशभरातील उत्कृष्ट क्षमतेचे गुणवत्तापूर्ण महाविद्यालय म्हणून निवडलेल्या १२३ महाविद्यालयात या संस्थेचा समावेश होतो. पदव्युत्तर विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसह नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम या महाविद्यालयात शिकविले जातात. दीड हजारावर विद्यार्थी येथे शिकत असून विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक प्राध्यापकांना संशोधन शिष्यवृत्ती प्रदान केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी दिली.
या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी देशातील प्रतिष्ठाप्राप्त संस्थेत कार्यरत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्याने या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ८ डिसेंबरला आयोजित केला आहे. याचदिवशी राष्ट्रीय खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन केले आहे.
प्रथम पुरस्कार २१ हजार रुपयाचा असून एकूण ५० हजाराची बक्षीसे ठेवली आहे. काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन विद्यमान विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी पुरविण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे निश्चित केले आहे. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सर्व माजी प्राचार्य व शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले असून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
२००० पूर्वी महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. आसमवार व डॉ. बावणकर यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.ठेंग (९८८१३८८५१०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.