गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश तालुक्यात शेतीचे नुकसान केले आहे. मात्र, सर्वाधिक शेतीचे नुकसान आमगाव तालुक्यात झाले आहे. येथे १०० हेक्टरमधील धानाचे पऱ्हे व रोवणी वाहून गेली. याला तालुका कृषी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी व रोवणीचेही संकट निर्माण झाले आहे.
आमगाव तालुक्यातील बुराडीटोला तलाव फुटल्याने व अतिवृष्टीमुळे बुराडीटोला, शिवनी व भजियापार परिसरातील शेतातील धानाचे पऱ्हे व रोवणी केलेले धान वाहून गेले. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम कृषी विभागाच्या वतीने सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी दिली. पावसामुळे घरांचीही पडझड झाली आहे. या संततधार पावसाचा फटका तालुक्यातील ३१.१६ हेक्टरमधील धानाच्या पऱ्ह्य़ांना बसला. पावसामुळे धानाचे पऱ्हे वाहून गेले. अदासी परिसतील ५ हेक्टरमधील पऱ्हे वाहून गेल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वाहने यांनी दिली.
गोरेगाव तालुक्यात २२ टक्के रोवणी पूर्ण झाली असून पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी सांगितले. या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागाच्या वतीने सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेती व घरांना बसला आहे. पावसामुळे जनावरांचे गोठे व घरांची पडझड झाल्याने जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गोंदिया तालुक्यात १५ कुटूंबांच्या ८१ लाभार्थीना ३ लाख ५९ लाख रुपये व १६ कुटुंबीयांच्या ५२ सदस्यांना १ लाख ९८ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले, तसेच या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नवरगाव खूर्द येथील विनोद मेश्राम पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची आíथक मदत मिळावी, यासाठी कागदपत्रे तयार करून प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. गोरेगाव तालुक्यात १५ आपदग्रस्त कुटुंबीयांना ६३ हजार रुपयांच्या आíथक मदतीचे वाटप करण्यात आले. यात पूरगाव, दवडीपार, हीराटोला या गावातील नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय, १४३ घरांचे अंशत: व ८ घराचे पूर्णत नुकसान झाले. त्याचबरोबर ३७ जनावरांचे गोठे वाहून गेल्याने एकूण ३ लाख ३५ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले.
आमगाव तालुक्यातील २१ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे ८२ घराचे अंशत: व ७ घराचे पूर्णत नुकसान झाले. यामुळे ७ लाख ९० हजार ५०८ रुपयांचे नुकसान झाले. या गावातील आपदग्रस्त कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जवरी येथील ४ व बनगाव येथील ३ परिवारांना १९ हजार रुपयांच्या आíथक मदतीचे वाटप करण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यात ६८ घरांचे अंशत: नुकसान झाले असून नुकसानीची आकडेवारी १६ लाख रुपयांपयर्ंत पोहोचली आहे. सालेकसा तालुक्यातील ३० गावांतील ४७ घरांचे अंशत: नुकसान झाले असून नुकसानीची आकडेवारी २ लाख ३४ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील जलाशये व तलावांच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. १३ तलाव पूर्ण भरले आहेत. यात देवरी तालुक्यातील आकटीटोला, ककोडी, सत्तरटोला, गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव, तेढा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गिरोला, मोरगाव, ताडगाव, गोंदिया तालुक्यातील खमारी, मुंडीपार, तिरोडा तालुक्यातील मेंढा या तलावांचा समावेश आहे.