गोंदिया शहराच्या दुर्गा चौक परिसरातील बरबटे ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी केल्यानंतर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकान मालकावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लच्छुसिंग ऊर्फ लच्छू केकाडिया अनारे (२८, रा. बारखेडा पोस्टबाग, जि.धार (मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
येतील दुर्गा चौक परिसरात व्ही.एच. बरबटे यांच्या मालकीचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ३ जुल २०११ च्या पहाटे ३.४७ वाजताच्या सुमारास दोन चोरटय़ांनी दुकानाचे दोन मुख्य चॅनल गेट व पाच दरवाजे फोडून आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.
या दुकानाशेजारी मुन्ना कटारे यांचे घर आहे. त्यांना पहाटेच्या सुमारास दुकानात जोराजोराने आपटण्याचा आवाज आला. त्यांनी लगेच याची सूचना मोबाईलवरून व्ही.एच. बरबटे ज्वेलर्सचे संचालक अरिवद बरबटे यांना दिली. यानंतर लगेच अरिवद बरबटे, सचिन बरबटे, विक्की झाडे, विश्वजित झाडे, दुर्गामंदिरचे चौकीदार भरणे लाठय़ाकाठय़ा घेऊन दुकानाच्या दिशेने गेले असता दुकानाचे मागील दार फोडलेले दिसले.
दुकानात दोघे जण शिरले असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड करण्यास सुरुवात केली व आपल्या सहकाऱ्यांसह दुकानात प्रवेश केला.
ही बाब चोरटय़ांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चोरटे व अरिवद बरबटे, सचिन बरबटे, विक्की झाडे यांच्यात झटापट झाली. मात्र, चोरटय़ांनी पिस्तुलातून दोन वेळा गोळ्या झाडल्या. यापकी एक गोळी अरिवद वासुदेव बरबटे यांच्या डाव्या पायाला लागली. त्यामुळे त्यांचे इतर सहकारी घाबरले. याच दरम्यान दोन चोरटय़ांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळ काढला. अरिवद बरबटे यांची प्रकृती गंभीर झाली होती.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील बोंडे, हवालदार गेंदलाल शेवटे यांनी केला. या घटनेसंदर्भात आरोपी लच्छुसिंग ऊर्फ लच्छू केकाडिया अनारे याला अटक करण्यात आली होती. दोन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करताना जिल्हा सत्र न्यायाधीश ए.सी. चाफले यांनी महिन्याची शिक्षा, दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारची बाजू अॅड. कैलाश खंडेलवाल यांनी मांडली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली सीएमएसी सेलचे सहायक पोलीस निरीक्षक महेश महाले, सहायक फौजदार जीवन नंदनवार यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.