गोंदिया जिल्ह्य़ातील सालेकसा, देवरी व आमगाव परिसरातील जंगलव्याप्त परिसरात वन्यप्राण्यांची शिकार होत असून वन्यप्राण्यांना अवयवयांची विक्री होत असल्याची चर्चा परिसरात सुरू असतानाच आमगाव येथे १० लाख रुपये किमतीच्या बिबटय़ाच्या कातडीसह दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई आज दुपारी आमगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांच्या पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रीतेश अरिवदकुमार गुप्ता (२३) व कैलाश मारोती
फुंडे (३३, दोन्ही रा.आमगाव-गोंदिया) यांचा समावेश आहे.
काही इसम बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, पोलीस निरीक्षक एम.आर.तरोणे, हवालदार तुळसकर, अनिस राठोड, सुमेध चंद्रिकापुरे, मनोज बाहेकार, शैलेंद्र नंदेश्वर, राकेश परिहार, यादोराम गौतम, गंगाधर मेंढे यांच्या पथकाने दुपारी बिबटयाचे चामडे विक्रीसाठी नेत असताना संजय पोल्ट्रीफार्मजवळ छापा टाकला असता यावेळी चौकशी आरोपी प्रीतेश गुप्ता व कैलाश फुंडे बिबटय़ाचे कातडे विक्रीसाठी घेऊन जात असतांना दिसून आले. पोलीस पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन आमगाव वनपरिक्षेत्राचे सहायक अधिकारी आर.जी.भांडारकर, वनरक्षक एस.एम.पवार, जे.जी.खान, डी.एम.गौरे यांच्याकडे कारवाईसाठी सोपविले.
विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वी मध्यप्रदेशातील बहेला पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली होती. यावेळीही
आरोपींकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 2:43 am