News Flash

उपराजधानीला गरज चांगल्या कलादालनांची!

नागपूरसह विदर्भात विविध स्वरूपाच्या कलाप्रदर्शनांचे प्रमाण वाढू लागलेले असताना, कलाकारांना उपयुक्त ठरतील, अशी चांगली कलादालनं उपराजधानीत असण्याची गरज निर्माण झाली आहे.

| January 13, 2015 08:27 am

कलावंतांची अपेक्षा

नागपूरसह विदर्भात विविध स्वरूपाच्या कलाप्रदर्शनांचे प्रमाण वाढू लागलेले असताना, कलाकारांना उपयुक्त ठरतील, अशी चांगली कलादालनं उपराजधानीत असण्याची गरज निर्माण झाली आहे. कलाकारांची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल व कलात्मक वातावरणही जपेल, असे चांगले कलादालन नागपुरात उपलब्ध होण्याची आवश्यकता कलावंतांनी व्यक्त केली आहे.
नागपूरसह विदर्भाच्या विविध ठिकाणी छोटी-मोठी कलाप्रदर्शने आयोजित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूरसारख्या ठिकाणी कला प्रदर्शने, विशेषत: छायाचित्रांची प्रदर्शने करू इच्छिणारे व छायाचित्रकार विदर्भात इतरत्रही मोठय़ा प्रमाणात आहेत. या सर्वाच्या सोयीच्या दृष्टीने नागपुरात कलादालन असावे, अशी अपेक्षा कलावंतांनी व्यक्त केली आहे. शहरात सिस्फाची छोटी गॅलरी, नागपूर सुधार प्रन्यासने सुरू केलेली रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरी, चिटणवीस सेंटर कलादालन यासारखी कलादालने आहेत. यापैकी रवींद्र कलादालनाची स्थिती आजही अत्यंत वाईट आहे. उद्घाटनांनतर हुक्का पार्लर आणि हुल्लडबाजीचे दिवस बघितलेल्या या दालनाकडे, प्रशासनाने आणि सोयींअभावी कलावंतांनीही पाठ फिरवलेली आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रासारखी मोठी संस्था येथे आहे. मात्र, त्यांच्या अखत्यारीतील कलादालन कलावंतांना उपलब्ध नाही. याच संस्थेने आता राष्ट्रीय कला प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले असून चांगल्या कलादालनाअभावी ते नागपूरऐवजी भोपाळ येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. केवळ चांगले कलादालन नसल्याने नागपुरातील रसिकांनी देशभरातील कलाकारांच्या निवडक कलाकृती बघण्याची संधी गमावलेली आहे. अशा परिस्थितीत, शहरातील व विदर्भातील कलावंतांना परवडेल, त्यांना सुविधा उपलब्ध होतील व आपल्या दृश्यकलांचे प्रदर्शन करता येईल, असे कलादालन नागपुरात उभे राहणे आवश्यक आहे.
‘अनेक चित्रकार, विविध छंद बाळगणारे लोक, निरनिराळ्या संस्थांना प्रदर्शनांकरिता जागेची गरज भासते. आज शासकीय कलादालने ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना कलावंतांच्या गरजा माहिती नाहीत. रवी वर्मा कलादालन किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक केंद्रात दालन आहे. त्या ठिकाणी योग्य लक्ष दिल्यास छोटय़ा व नवीन कलावंतांना चांगली जागा उपलब्ध होऊ शकते. पर्यटन विकास महामंडळ विदर्भातील विविध पर्यटन केंद्राच्या छायाचित्रांची प्रदर्शने आयोजित करून पर्यटनवाढीला प्रोत्साहन देऊ शकते. त्यांच्या कलादालनाचा चांगला उपयोग केला गेला पाहिजे,’ असे सीएसी ऑलराऊंडरचे अमोल खंते यांनी सांगितले.
विविध प्रदर्शनांमधून आपल्या कलाकृती सादर केलेले येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक व तरुण चित्रकार किशोर इंगळे यांनी नव्या कलादालनाची व ते योग्य व्यक्तीकडे सोपविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शहरात चांगल्या ठिकाणी कलादालन तयार व्हावे, यासाठी पाठपुरावा केला गेला पाहिजे. मुंबईसारख्या ठिकाणी कलादालने रसिकांच्या व कलावंतांच्या विशेष नोंदी ठेवतात व याद्याही तयार करतात. प्रदर्शने लागली की, या यादीतील लोकांना संपर्क केला जातो व त्यातून खात्रीशीर प्रेक्षकही कलाकाराला लाभतात. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या येथील कलादालनातून व्हायला हवी, असेही इंगळे म्हणाले.
जे.जे. कला महाविद्यालयातून निवृत्त झालेले ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पाटील यांनी नागपुरातील कलादालनांनी स्थानिक कलावंतांबरोबरच बाहेरच्या कलावंतांची प्रदर्शने, तसेच कलाविषयक व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करण्याचा सल्ला दिला. यातून कलाविषयक वातावरण तयार होईल व कलादालनासह संबंधित इतर बाबींना देखील चालना मिळेल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:27 am

Web Title: good art galleries much needed in nagpur
टॅग : Loksatta,Nagpur,News
Next Stories
1 बिल्डर व खासगी रुग्णालयांकडून बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन
2 मांजाबद्दलचे धोरण सात दिवसांत ठरवा
3 दुर्मीळ ‘व्हाईट फ्रंटेड गुज’चे पुन्हा दर्शन
Just Now!
X