News Flash

मिरवणुकांनी आज गणरायाला निरोप

गेले नऊ दिवस सुखकर्त्यां गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर आता गणेशभक्तांना बाप्पांच्या विसर्जनाचे वेध लागले आहेत. अवघी करवीर नगरी जल्लोषी मिरवणूक काढून बाप्पांना निरोप देण्यासाठी सज्ज

| September 18, 2013 02:07 am

मिरवणुकांनी आज गणरायाला निरोप

गेले नऊ दिवस सुखकर्त्यां गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर आता गणेशभक्तांना बाप्पांच्या विसर्जनाचे वेध लागले आहेत. अवघी करवीर नगरी जल्लोषी मिरवणूक काढून बाप्पांना निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईतील जस्ने इव्हेंटस् ग्रुपचा नृत्याविष्कार,दीड किलोमीटर अंतरावरून छायाचित्र काढणारे हेक्झा-कॉप्टर, आधुनिक तंत्रज्ञानाचा लेसर शो, सजीव देखावा, पर्यावरण संदेश यात्रा, श्री गणेश विराजमान झालेली बग्गी हे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे.     
गणेश चतुर्थीपासून करवीर नगरीत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. उद्या बुधवारी लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्याची लगबग आज दिवसभर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती.मिरवणुकीच्या वाहनांची पाना-फुलांद्वारे केलेली सजावट, मंडळांचे रंगीबेरंगी ध्वज, ध्वनियंत्रणा असा लवाजमा जमविण्याचे काम घाईगडबडीत सुरू होते. अशातच अधूनमधून पावसाच्या लहान व मध्यम सरी येत असल्याने तयारीमध्ये विघ्न येत होते. किमान उद्याच्या दिवशी तरी वरूणराजाने सुटी घ्यावी, अशी विनवणी बाप्पांकडे मंडळांचे कार्यकर्ते करीत होते.    
१३४ वर्षांची परंपरा असलेल्या तटाकडील तालीम मंडळाने विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे.मुंबई येथील जस्ने इव्हेंटस् या ग्रुपचा आविष्कार हे या मंडळाचे वैशिष्टय़ असणार आहे. मशाल, गॅसबत्ती,प्रकाश दिवे यांच्या प्रकाशझोतात मिरवणूक काढणारे हे मंडळ यंदा चोवीस बाय पंचवीस फुटाच्या मंचावर २४ कलाकारांचा नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे. मराठमोळ्या लावणीपासून ते पंजाबी भांगडा,गुजराती गरबा असा नृत्याचा राष्ट्रीय मेळ पहायला मिळणार आहे.    
शिवाजी पेठेतील हिंदवी स्पोर्टस्ने यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल दाखविण्याचे ठरविले आहे.त्यासाठी दीड किलोमीटर उंचीवरून छायाचित्र काढून ते स्क्रिनवर दाखविणारे हेक्झा-कॉप्टर या मंडळाकडून आणले जाणार आहे. त्यामुळे आकाशात मंडळाची तसेच एकूणच विसर्जनाची मिरवणूक कशी दिसते याचा अनोखा अनुभव करवीरकरांना पहायला मिळणार आहे. याशिवाय लेसर शो, एलईडी वॉल, फ्लाईंग मशिन,एअरशीप कॅमेरा ही सुध्दा या मंडळाची आणखी कांही वैशिष्टय़े आहेत.    
यंदा विसर्जन मिरवणुकीत बाप्पा बग्गीतून निघणार आहेत. निवृत्ती तरूण मंडळाचे सुमारे २००कार्यकर्ते वैशिष्टय़पूर्ण गणवेशात बाप्पा विराजमान झालेली बग्गी हाताने ओढत पंचगंगा नदीपर्यंत नेणार आहेत. तर, ‘श्री हरी दशवतार’ हा चित्ररथ लेटेस्ट तरूण मंडळाकडून सादर केला जाणार आहे. सावंतवाडी येथील आजगावकर नाटय़मंडळाचे कलाकार दशावताराचा सजीव देखावा सादर करणार आहेत.    
पोलिसांनी डॉल्बी लावू नये यासाठी गणेशोत्सवाच्या अगोदरपासूनच तयारी केली होती, पण गणरायाचेआगमन होतांना अनेक मंडळांनी डॉल्बी लावला होता. त्यावरून नागरिकांत कडवट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची दखल घेऊन विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावलेले मंडळ सहभागी होणार नाही, याची दक्षता पोलीस घेणार आहेत. तर कांही मंडळांनी डॉल्बी लावूनच मिरवणुकीत उतरण्याचा निर्धार करून एकापरीने पोलिसांनाच आव्हान दिले आहे. या पाश्र्वभूमीवर उद्याच्या विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांत व पोलिसांत खटके उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊनच शहरातील पोलीसबंदोबस्त मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आला आहे. याशिवाय गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस मित्र यांचीही मदत घेतली आहे. या सर्वाना आज पोलीस परेड मैदानात बंदोबस्ताबाबत विशेष सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अपर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी बंदोबस्ताबाबत पोलीस कर्मचा-यांची तयारी करून घेतली आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2013 2:07 am

Web Title: good bye to lord ganesha with procession
टॅग : Lord Ganesha
Next Stories
1 सांगलीत विसर्जन मार्गावर यंदा २१ स्वागत कमानी
2 सोलापुरात श्री विसर्जनाच्या मिरवणुकांवर पावसाचे सावट
3 शेतक-यांकडून लाच घेताना सरकारी कर्मचा-यांना अटक
Just Now!
X