वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत नद्यांचे वाढते प्रदूषण चिंताजनक असल्याने नद्यांच्या योग्य व्यवस्थापनेची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागचे निवृत्त सहायक मुख्य अभियंता श्रीकांत डोईफोडे यांनी केले आहे.
‘नद्यांचे प्रदूषण व पर्यावरण’ या विषयावर फ्रेण्डस् इंटरनॅशनल नागपूर आणि सिंचन सहयोग या संस्थांच्या सहकार्याने श्रीकांत डोईफोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नद्यांच्या स्वच्छतेबाबत आपल्याकडे उदासीनता आहे, असे डोईफोडे म्हणाले. गंगानदी स्वच्छता अभियान १९९० मध्ये सुरू करण्यात आले होते; परंतु या नदीची आजची स्थिती १९९० पेक्षाही खराब आहे. मातेच्या भूमिकेतून आपण नदीकडे बघतो. त्यामुळे पूजा, तसेच क्रियाकर्म करून निर्माल्य, पूजा साहित्य नदीत विसर्जित करण्यात येत असल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असते. हे सर्व करत असताना आपण नदीच्या स्वच्छतेचा विचार करत नाही, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील नद्यांमध्ये सांडपाणी व औद्योगिक वसाहतींमधील निरुपयोगी पाणी मोठय़ा प्रमाणात सोडले जाते.  गोसीखुर्द आणि जायकवाडी धरणातदेखील अशाच प्रकारचे पाणी जमा होत आहे याची कोणीच दखल घेत नसून संबंधित मनपा व औद्योगिक क्षेत्रांनी एकत्र येऊन नद्यांचे प्रदूषण थांबवायला हवे. अशाच प्रकारे तापी, गोदावरी या नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जात असून कोल्हापूरच्या पंचगंगेत तर तेथील चर्म उद्योगातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. नागपूरच्या नागनदीची देखील हीच अवस्था असून औद्योगिक क्षेत्राबरोबरच लोकांनीही याचा गांभीर्याने विचार करून नद्यांचे प्रदूषण थांबवावे, असे आवाहन डोईफोडे यांनी केले. फ्रेण्डस् इंटरनॅशनलचे अध्यक्ष ओम जाजोदिया यांनी डोईफोडे यांचे स्वागत केले तर परिचय सिंचन सहयोगचे अध्यक्ष यू.पी. वानखेडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन सिंचनचे सहसचिव एम.जी. देशपांडे यांनी तर संतोष जैन यांनी आभार मानले.