कवी प्रा. रविशंकर झिंगटे यांच्या ‘वेलांटय़ा आणि उकार’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांच्या हस्ते झाले. ‘वेलांटय़ा आणि उकार’मधील कविता ही स्वाभाविक आहे. या कवितेला कोणत्याही वर्गीकरणात बसवता येणार नाही. कवितेची व आपली बालपणापासून ओळख असते. आपल्या सर्वासाठीच हे माध्यम परिचित असे आहे. चांगला वाचक हा कवितेसमोर कायमच विनम्र असतो, असे उद्गार डॉ. जहागीरदार यांनी काढले. कवी झिंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना आपली कविता म्हणजे समकालीन वास्तवाला दिलेला प्रतिसाद असल्याचे सांगितले. सामाजिक पटलावरील नोंदी घेताना आपल्याला कवितेच्या रूपाने सहज शब्द सुचतात. कविता हीच या वास्तवावरील आपली प्रतिक्रिया आहे, असेही ते म्हणाले. येथील गणेश वाचनालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरातील रसिकांची मोठी उपस्थिती होती.