चांगला खेळाडू सरावातूनच घडत असतो. हा सराव स्पर्धामधून होतो, म्हणूनच बुद्धिबळाच्या येथे होतात तशाच स्पर्धा ठिकठिकाणी वारंवार व्हायला हव्यात, असे मत भारतातील सर्वात लहान ग्रँड मास्टर विदित गुजराथी याने केले. डी. एल. बी. बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठान आयोजित व शांतीकुमार फिरोदिया ट्रस्ट प्रायोजित अखिल भारतीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन गुजराथी व नरेंद्र फिरोदिया यांनी एक चाल खेळून केले. त्यानंतर गुजराथी याने एकाच वेळी तब्बल २० खेळाडूंबरोबर खेळ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रिडाधिकारी अजय पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरचे डॉ. शाम माळी, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपक्षेत्रीय प्रबंधक केंगे उपस्थित होते. सप्तक सदन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशाच्या अन्य राज्यांतूनही तब्बल २१० खेळाडू आले आहेत. त्यापैकी तब्बल ९४ खेळाडू मानांकन प्राप्त आहेत, अशी माहिती यावेळी स्पर्धेचे प्रमुख संयोजक यशवंत बापट यांनी दिली. मुख्य प्रायोजक नरेंद्र फिरोदिया यांनी संस्थेला यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्पर्धा २५ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार असून प्रमुख पंच म्हणून प्रविण ठाकरे, अंबरिश जोशी व श्रुती पटवर्धन काम पाहणार आहेत, अशी माहिती ठोंबरे व शाम कांबळे यांनी दिली.