‘गुगल अर्थ’ची लोकप्रियता लक्षात घेता भारतीय बनावटीचे ‘भुवन’ फारसे कुणाला माहीत असण्याची शक्यता तशी कमीच. पण गुगल अर्थसारखीच सेवा देणाऱ्या भुवनने आता कात टाकली असून त्याचे ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ बाजारात आले आहे. त्यामुळे आपण कुठे आहोत हे आपल्या मोबाइलवर समजणे सहज शक्य होणार आहे.
गुगल अर्थप्रमाणेच सर्व सुविधा यामध्ये देण्यात आल्या असून यामध्ये थ्रीडी, टुडी अशा इमेजेस उपलब्ध आहेत. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) २००९मध्ये ‘भुवन’चे अनावरण केले. यामध्ये भारताबद्दलची अगदी सविस्तर माहिती आहे. भारतातील नसíगक स्रोतांपासून ते विविध महत्त्वाच्या ठिकाणांची माहितीही यात देण्यात आली आहे. यासाठी अर्थातच भारतीय बनावटीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला आहे.
या सर्व सुविधा आपल्याला आता आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड अ‍ॅपच्या मदतीने मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला आपल्या शेजारच्या गोष्टीही पाहता येणार आहेत. गुगल अर्थमध्ये आपल्याला आपला परिसर शोधण्यासाठी करावे लागणारे कष्ट ‘भुवन’मध्ये अगदी कमी होतील. यामध्ये आपण आपल्या परिसराच्या माहितीची भरही घालू शकतो. ती माहिती तपासून ‘भुवन’मध्ये ठेवली जाते.
‘भुवन’ची वैशिष्टय़े
* जमीन, पाण्याचे स्रोत, मोकळी जमीन आदीची माहिती यामध्ये आपल्याला टुडी आणि थ्रीडीमध्ये उपलब्ध होणार आहे.
* यामध्ये ‘रस्ता मार्गदर्शक’ असून त्याचा उपयोग आपण प्रवासात करू शकतो.
* यामध्ये आपण सूचित केलेल्या ठिकाणाची माहिती अपलोड करायची असेल तर टुडी आणि थ्रीडीमध्ये ती माहिती देण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
* मोजणीचे साहित्य यामध्ये देण्यात आले असून आपण एखादे अंतर मोजण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.
* यामध्ये सूर्यप्रकाशात येणारी सावलीही आपल्याला दिसते. यामुळे यातील ‘श्ॉडो अ‍ॅनालिसिस’चा वापर करून सुविधा अधिक प्रभावीपणे वापरता येऊ शकते.