भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील श्री गोपाळ गोशाळा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोधनातून जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील बालवाडय़ांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी अनगावच्या गोशाळेस १५ दुभत्या गायी दान करणार असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऑक्टोबर महिन्यापासून २५० विद्यार्थ्यांना महिन्यातले २६ दिवस माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी महिन्यात आणखी १५ गायी देण्यात येणार असून त्यामुळे आणखी २५० मुलांना माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.
सध्या गोशाळेच्या वतीने आठवडय़ातील दोन दिवस मोखाडा आणि जव्हार तालुक्यातील तब्बल दोन हजार मुलांना कडधान्याची उसळ दिली जाते. गोशाळेत एकूण १७०० गायी-बैल असून त्यातील १५० गायी दुभत्या आहेत. गायीचे दूध तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीतून दैनंदिन खर्च चालविला जातो. रोटरी क्लब गुजरातमधील गीर येथील देशी गायी गोशाळेस दान करणार आहे. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोशाळेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना महिन्यातले २६ दिवस माध्यान्ह भोजन दिले जाईल, अशी माहिती गोशाळेचे डॉ. सुधीर रानडे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.
असा असेल आहार
गोशाळेने या योजनेतून दिला जाणारा आहारही निश्चित केला आहे. ७० ग्रॅम तांदूळ, २९ ग्रॅम अख्खे मूग, एक ग्रॅम मिरी भाजून तयार करण्यात आलेल्या रव्याची खिचडी प्रत्येक विद्यार्थ्यांला दिली जाणार असून त्यावर पाच मिलीग्रॅम साजूक तूप टाकले जाणार आहे. या आहारामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होईलच, शिवाय डेंग्यू-मलेरियासारख्या आजारापासून ही मुले दूर राहतील, असा विश्वासही डॉ. रानडे यांनी व्यक्त केला आहे.
कुपोषण दूर करण्याचा प्रयत्न
ठाणे रोटरी क्लबच्या सदस्यांनी वर्गणी काढून गायी खरेदी केल्या आहेत. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना किमान एक वेळ पौष्टिक आहार मिळून त्यातून कुपोषणाची समस्या काही प्रमाणात दूर होईल, असा विश्वास विद्यमान अध्यक्ष वसंत गोगटे यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात हा योजनेचा विस्तारित प्रकल्प राबवून सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांना पौष्टिक माध्यान्ह भोजन देण्याचा प्रयत्न करू, असा असेही त्यांनी सांगितले.