लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी आयोजित विभागीय मेळाव्यात टीकेचे लक्ष्य होते गोपीनाथ मुंडे. मराठवाडय़ातील या मेळाव्यात नव्यानेच विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, गृहमंत्री आर. आर. पाटील व आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी भाषणात गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली. आधी जाहीर होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या मेळाव्यास अनुपस्थित होते. खासगी विमान उपलब्ध होऊ न शकल्याने ते येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.
मराठवाडय़ात गोपीनाथ मुंडे यांचा तसा प्रभाव राहिला नाही. ते स्वत: दीड लाख मतांनी निवडून आले खरे, पण त्यांची मुलगी वगळता मराठवाडय़ात त्यांना एकही आमदार निवडून आणता आला नाही, अशी टीका करीत प्रदेशाध्यक्ष जाधव म्हणाले, की सध्या मुंडे विधान परिषदेत राष्ट्रवादीची आठ-दहा मते फुटली, असे सांगत फिरत आहेत. माझे घर पवारांनी फोडले, असेही ते सांगतात. घर फुटल्याचा धोशाच त्यांनी लावला आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेताना मोहिते-पाटलांचे घर त्यांनी फोडले नाही का? शिवाजीराव पाटील निलंगेकरांची सून आणि नातू यांना त्यांच्या पक्षात घेताना ते घर काय मुंडेंनी बांधले का? असा सवाल करताना सध्या मुंडेंचे वक्तव्य म्हणजे ‘तुमनाच डाल, तुमनाच भात, नाच रं खोता, सारी रात’ या कोकणातल्या म्हणीप्रमाणे झाले असल्याचा टोला जाधव यांनी लगावला.
धनंजय मुंडे यांना २१ मते अधिक मिळाल्याचा दावाही जाधव यांनी भाषणात केला. त्यांच्या भाषणापूर्वी धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. वेळेअभावी त्यांना भाषणाची संधी देता आली नाही, असेही जाधव म्हणाले. मेळाव्यात राष्ट्रवादीच्या बहुतांशी नेत्यांनी खासदार मुंडेंवर टीका केली. विजेच्या प्रश्नावर पिचड यांनी, विजेचा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे चिघळला, असा आरोप केला. धनंजय मुंडे यांना उद्देशून पिचड म्हणाले, की तुझ्या चुलत्यामुळेच एन्रॉनचा प्रश्न चिघळला. तो लवकर सुटला नाही आणि विजेच्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागले. पण आता काळजी करण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी मुंडेंवर टीका केली.
जाधव व पिचड यांच्यापाठोपाठ गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुंडे यांना लक्ष्य केले. सिंचनाचा घोटाळा झाल्याची टीका होत आहे. वास्तविक, ७० हजार कोटी रुपये सिंचनावर कधी खर्चच झाले नाहीत. त्यामुळे या रकमेचा घोटाळा होणे शक्यच नाही. सिंचन घोटाळ्याची टीकात्मक स्वरूपात बाहेर येणारी आकडेवारीचे चित्र म्हणजे ‘म्हशीपेक्षा रेडकू मोठे’ असेच म्हणावे लागेल, असे पाटील म्हणाले. मराठवाडय़ातील सिंचनातील अनुशेषाचा अभ्यास नसणाऱ्या मंडळींनी केलेली टीका चुकीची असून सत्तेवर आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडय़ातील पाटबंधारे योजनांवर १६ हजार ५५१ कोटी रुपयांचा खर्च केला. मुंडे यांच्याकडेही हेच खाते होते. त्यांनी मराठवाडय़ात या खात्यात केलेला खर्च आणि अजितदादा यांनी केलेला खर्च हे मुंडे एका व्यासपीठावर येऊन सांगू शकतात काय, असा सवाल उपस्थित करून त्यांनी मुंडेंवर टीका केली.
मेळाव्यात मुंडेंवर टीका करतानाच कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केले, तर राज ठाकरे यांची टीका जिव्हारी लागली असल्याने आर. आर. पाटील यांनी राज ठाकरेंवर कडक टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणातील भाषा असभ्य आहे. मात्र, ज्या-त्या वेळी या टीकेला उत्तर दिले जाईल. पक्षाने परवानगी दिली, तर त्यांना जेवढे शेळके शब्द माहीत नसतील, त्यापेक्षा अधिक आपल्याला माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.