गोरेगावमधील आरे कॉलनी ही मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखली जाते. अन्य उपनगरांच्या तुलनेत आरे कॉलनी आणि आसपासचे तापमान सुमारे ३-४ अंशांनी कमी असते. इथली भरगच्च हिरवाई हेच याचे कारण आहे. पण गेल्या काही वर्षांत या हिरवाईला समाजकंटकांची दृष्ट लागली आहे. आरे कॉलनीमध्ये भयावह प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. ही झाडे सहसा सलग तोडली जात नाहीत. कोणाच्या नजरेस येणार नाहीत अशा बेताने मधली मधली झाडे तोडली जातात. आरे कॉलनीत नियमित फिरायला येणाऱ्यांना झाडे कमी होत असल्याचे ध्यानात येऊ लागले आहे. परंतु काही संरक्षित भागात सर्वसामान्यांना जाण्यास बंदी असल्याने तेथे होत असलेली वृक्षतोड लवकर लक्षात येत नाही. गोरेगावमधील काही जागरूक नागरिकांनी याबाबत अनेकदा आवाज उठविला आहे. परंतु सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने ही वृक्षतोड अबाधित सुरूच आहे. छायाचित्रात बुंधे कापल्याने उघडीबोडकी झालेली जमीन दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात झाडावर चढून बेकायदा फांद्या तोडणारा एक जण दिसत आहे.