नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. स्त्री-पुरुष नातेसंबंध, त्यांचे बदलते संदर्भ, या नातेसंबंधांतील ताणतणाव, मराठी चित्रपटसृष्टीतील न्यूनगंडाचे राजकारण, हिंदी चित्रपटसृष्टीतील विषयांचे वैविध्य, त्याची कारणं अशा अनेक गोष्टींबाबत या सगळ्याच मंडळींनी दिलखुलासपणे आपली मतं मांडली. या खुमासदार गप्पांचा सविस्तर लेखाजोगा खास ‘रविवार वृत्तांत’च्या वाचकांसाठी..
माझी ‘प्रेमाची गोष्ट’
माणूस म्हणून मलाही स्त्री-पुरुष संबंधांबद्दल खूप आकर्षण आहे. केवळ असे संबंध नाही, तर त्याचा आधुनिकपणा आणि त्यातून आपण पुढे कुठे जाणार आहोत, हा भागही येतो. त्यामुळे या सगळ्या पाश्र्वभूमीवर मी सतीशने पाठवलेली गोष्ट वाचली, त्यावेळी ती पहिल्यांदा वाचताना मला वाटलं होतं की, या गोष्टीचा शेवट नेहमीच्या पठडीतल्या शेवटासारखाच होईल. म्हणजे ती बायको परत येईल, तिला नात्याची महती पटेल, वगैरे वगैरे.. पण त्याने शेवटी असं विधान केलं की, त्याची बायकोच त्याला सांगते की तू प्रेमात पडला आहेस. तिथेच मी या गोष्टीच्या प्रेमात पडलो. लग्न ही शेवटी माणसाने तयार केलेली सिस्टीम आहे. त्यात प्रवाह असणं आवश्यक आहे.

बदलत्या काळानुसार या लग्नसंस्थेत बदल व्हायलाच हवेत. आताचा काळ तर खूपच महत्त्वाचा आहे. कारण सध्या स्त्री ही आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाली आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. इतकी र्वष जेव्हा स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते आणि काही मत नव्हतं तेव्हा लग्नं ७०-७० र्वष टिकत होती. तेव्हा पुरुषच सगळं बघत होते. पण त्या लग्नांना टिकणं म्हणायचं का? चित्रपटात रोहिणीताईंच्या तोंडी एक खूप छान वाक्य चिन्मयने लिहिलं आहे. ‘जर तुम्ही तसेच ओढत राहिलात तर संसार होईल, सहवास नाही.’ या चित्रपटात मला काहीच करायचं नव्हतं. फक्त वावरायचं होतं. ते वावरणं खूप कठीण होतं. ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. ‘नटरंग’सारखी अत्यंत नाटय़पूर्ण गोष्ट करणं वेगळं आव्हान होतं. पण त्यात काहीतरी सहजपणा होता. पण सहज साधं काम करणं जास्त आव्हानात्मक होतं.

हिंदी चित्रपटकर्त्यांबद्दल आदरच आहे!
भारतात हिंदी चित्रपट काढणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण तुम्हाला पॅन इंडिया चित्रपट बनवायचा असेल, तर तुम्ही किती संस्कृती, भाषा वगैरे लक्षात घेऊन विचार करणार? हा ताण एवढा असतो की, हिंदी चित्रपटात कायम सगळ्याला बॅलन्स करणारं काहीतरी मिक्स्ड घेऊन यावं लागतं. मला सगळ्या प्रेक्षकांना रिझवायचं आहे, ही भावना कुठेतरी असते. पाश्चात्त्य देशांमधील क्रॉस सेक्शन आणि भारताचा क्रॉस सेक्शन यात आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असे सगळेच फॅक्टर वेगळे आहेत. पंजाबमध्ये चालेल ते दक्षिणेत नाही, दक्षिणेत चालेल ते बंगालमध्ये नाही, बंगालमध्ये ते उत्तरेकडे नाही वगैरे वगैरे. त्यामुळे या सगळ्याचा मेळ घालून हिंदी चित्रपट तयार करणाऱ्यांबद्दल मला नक्कीच खूप आदर आहे. चित्रपटात दोन तासांत गोष्ट सांगायची असल्याने काही गोष्टींच्या बाबतीत टाइपकास्ट व्हायला हवं. महाराष्ट्रातील चित्रपटांत नोकर नेहमी मराठी माणूसच का दाखवतात, हा प्रश्न अत्यंत गैर आहे. आता दिल्लीतला चित्रपट असेल, तर मग तिथे नोकर म्हणून बंगाली बायका दाखवतील. कारण तिथे बांगलादेश किंवा बंगालमधून आलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. आता हिंदी चित्रपटात मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्याचं नाव नेहमीच मराठीच असतं. ते असणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडत नाही. म्हणजे उद्या नाव काहीतरी वेगळं असलं, तर लोक त्याबद्दलच चर्चा करत बसतील. ही फार अवघड गोष्ट आहे. मेट्रो फिनॉमेना आता केवळ मुंबई-पुणे यापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. आता मुंबई म्हटल्यावर ठाणे, कल्याण, कर्जत वगैरे गोष्टींचाही विचार करावा लागतो. पार सोलापूर, कोल्हापूर वगैरेही शहरं त्यात घ्यावीच लागतात.

न्यूनगंडाचं राजकारण
हिंदी चित्रपटसृष्टी आशयाच्या बाबतीत मराठीपेक्षा कमी आहे, असं अजिबात नाही. असं काहीतरी बोललं गेलं की आपल्याला उगाच गुदगुल्या होत असतात. पण तसं खरंच काही नाही. हिंदी चित्रपटांच्या विषयांतही प्रचंड वैविध्य आहे. साधे गेल्या वर्षीचे चित्रपट पाहा किंवा विविध पुरस्कार सोहळ्यातील मानांकनांकडे नजर टाका! ‘पानसिंग तोमर’, ‘कहानी’, ‘विकी डोनर’, ‘बर्फी’, ‘गँग्ज ऑफ वास्सेपूर’, ‘दबंग’ असे अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट गेल्या वर्षी हिंदीत झाले. आता यापेक्षा जास्त विविधता काय हवी आहे? हा सगळा गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात जाणूनबुजून केल्या गेलेल्या न्यूनगंडाच्या राजकारणाचा परिपाक आहे. आम्ही कसे कमी आहोत, हे सतत दाखवून द्यायचं. मग मी तुमचा तारणहार, अशी भूमिका कोणीतरी घ्यायला तयारच असतो. मग हे राजकारण कधी भाषेच्या आधारावर केलं जातं, कधी जातीच्या, तर कधी धर्माच्या! आम्हीही इतकं मस्त विकत घेतो हे न्यूनगंडाचं राजकारण की, मला थक्कं व्हायला होतं. मी हिंदी चित्रपट जास्त केले आहेत मराठीपेक्षा. पण मला हिंदी चित्रपटसृष्टीत कुठेही कमीपणाची वागणूक मिळालेली नाही. हिंदी चित्रपट सध्या खूप मस्त चालला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत इतका उत्तम काळ कधीच नव्हता. हिंदीत जास्त वैविध्य आहे कारण त्यांच्याकडे खूप पद्धतीच्या कहाण्या आहेत. बंगाली दिग्दर्शक बंगाली फ्लेवर आणतात, मराठी दिग्दर्शक महाराष्ट्रातून काहीतरी घेऊन जातात, प्रकाश झा वगैरे लोक बिहारचा फ्लेवर आणतात, दक्षिणेकडून अत्यंत मसालेदार पदार्थ येतात, दार्जिलिंग वगैरे त्या टप्प्यातून तेथील संस्कृती येते, पंजाबच्या मातीचा गंध तर हिंदी चित्रपटसृष्टीत खूपच जुना आहे. हा खूप फार अप्रतिम काळ आहे. एखादी वाढती बाजारपेठ दिसली की, त्याकडे सगळेच जण आकर्षित होतात. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टी सध्या मोठी होत आहे.


    
.. आणि पटकथा तयार झाली!
‘‘या गोष्टीच्या पटकथेचीही गंमत आहे. माझ्याकडे गोष्ट होती. ती मी अतुलना पाठवली. ती पाठवताना अतुल सरांना ही गोष्ट आवडली नाही तर, अशी भीती नक्कीच होती. त्यांना ती गोष्ट आवडावी, असं वाटत होतं. त्यांना ती आवडली आणि त्यांनी विचारलं की, पटकथा व संवाद कोण लिहिणार आहे. मी त्यांना सांगितलं की, मी ज्याच्याबरोबर आधी काम केलं नाहीए, अशाच कोणाबरोबर तरी काम करायचं आहे. मग त्यांनीच मला चिन्मयचं नाव सुचवलं. मी चिन्मयला भेटल्यानंतर त्याला ती गोष्ट ऐकवली आणि दिली. मी त्याला म्हटलं की, तू तुझ्या कल्पनेने त्याचा अख्खा आराखडा बांध. त्याने मला विचारलं की, तुझा काही अट्टाहास आहे का की, गोष्ट कशी घडावी, कोणत्या फॉर्ममध्ये घडावी वगैरे. पण मी त्याला सांगितलं की, तसं अजिबात नाहीए. तू तुझ्या कल्पनेप्रमाणे काम कर. संपूर्ण पटकथा व संवाद चिन्मयने बांधले आहेत. आम्ही चर्चा करायचो, दिशा योग्य आहे की नाही वगैरे. कधीकधी तो खूप लिहून आणायचा. मग त्यातून निवडायचं. आम्ही निवडल्यानंतर अतुल सरांबरोबर जेव्हा बसलो, तेव्हाही ती गोष्ट खूप मोठी असल्यासारखी वाटत होती. त्यातही मग बरीच काटछाट झाली. किमान पाच ते सहा ड्राफ्ट्स झाले या गोष्टीचे. पण पात्र जे काही बोलतात, गोष्ट जशी बांधली गेली आहे, ते सगळं श्रेय चिन्मयचं आहे.’’

‘प्रेमाची गोष्ट’ माझ्या मनात घोळायला सुरुवात झाली त्या वेळी या साध्या, सरळ आणि सोप्या गोष्टीनं मला खूप अस्वस्थ केलं. म्हणजे आपापल्या आयुष्यात घटस्फोट घ्यायला आलेली दोन माणसं कौटुंबिक न्यायालयात अपघातानं एकत्र भेटतात. आपापल्या घटस्फोटांकडे बघण्याचे त्या दोघांचेही दृष्टिकोन अत्यंत वेगवेगळे आहेत. म्हणजे अतुलचा दृष्टिकोन आहे, ‘नातं संपलं तरी प्रेम कायम राहतं. मी माझ्या बायकोची ती परत येईपर्यंत वाट पाहीन.’ हा समाजातला एक गट आहे. त्याचं प्रतिनिधित्व अतुल करतोय. तर दुसऱ्या बाजूला अतुलच्या या म्हणण्यावर, ‘मस्त! सोशल नेटवर्किंग साइटवर स्टेटस म्हणून टाकायला मस्त वाक्य आहे. खूप लाइक्स मिळतील. पण माझ्याकडून डिस्लाइक,’ असं म्हणणारी सागरिकाही अशाच एका वेगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतेय. समाजात हे दोन घटक आहेत, ही विभागणी झाली आहे त्यावर बेतलेली ही माझी ‘प्रेमाची गोष्ट’ आहे.  बांधीलकी आहे म्हणून नातं जपत बसायचं का? की पटत नाही तर वेगळे होऊन पुढे सरकू, या मताने पुढे जायचं? अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या काळात आपण वावरत आहोत. समाजातील एक घटक हा मन आणि बुद्धी या वादात नेहमीच बुद्धीला महत्त्व देतो. पण प्रेमात मनाचं कोणीच ऐकत नाही. आता माझ्याकडची सायकल कधीही पंक्चर होऊ शकते, तसंच माझं लग्नही कधीही पंक्चर होऊ शकतं. घटस्फोट घेण्यासाठी म्हणून जगात कोणीच लग्न करत नाही ना! पण मग त्या पायरीपर्यंत एखादं नातं पोहोचलं असेल, तर मग आयुष्यच संपल्यासारखं वाटतं. मग कुठेतरी खचल्यासारखं होतं. पावलं आपोआप मानसोपचारतज्ज्ञाकडे वळतात. आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची आणि सोन्यासारखी र्वष कोर्टात भांडण्यात वाया जातात. पण, मग नातं तोडून वेगळं होण्यापेक्षा जोडीदाराला पुढे जाऊ देत आपुलकी तशीच ठेवून वेगळं होण्यात काय चूक आहे! मला माझ्या गोष्टीत नेमकं हेच पकडायचं होतं. पण, मग नातेसंबंधातला समजूतदारपणा किंवा सहनशक्ती कशी कमी झाली आहे, याबाबत कोणतंही सामाजिक भाष्य, निदान संवादाच्या माध्यमातून तरी न करता, मला ही गोष्ट मांडायची होती. विशेष म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा शेवट अत्यंत बोधक वगैरे करण्याची खूप चांगली संधी होती. पण तो मोह टाळत खूप साधी, सरळ आणि सोपी प्रेमाची गोष्ट घेऊन आम्ही समोर आलो आहोत.

मराठी चित्रपट आता कक्षा ओलांडतोय
हिंदी चित्रपटसृष्टीशी तुलना केली, तर नव्या दमाचा मराठी चित्रपट आत्ता गेल्या आठ-दहा वर्षांचाच आहे. पण तरीही मराठी चित्रपटाने एवढय़ा कमी काळात खूपच चांगली मजल मारली आहे. मराठी चित्रपट आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशात पसरत चालला आहे. ‘जोगवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘नटरंग’ किंवा ‘बालक-पालक’ असे चित्रपट देशभरात बघितले गेले आहेत. आता मराठी चित्रपट भाषेची कक्षा ओलांडत आहेत.
प्रेक्षकांना ‘गोष्ट’ आवडते
सध्या अत्यंत मालमसाला असलेले आणि दे मार हाणामारीचे चित्रपट प्रचंड गल्ला जमवताना दिसतात. पण हा मसाला वापरून बनवलेला प्रत्येक चित्रपट चालतोच, असं नाही. हा चित्रपट बनवण्याआधी ‘इंग्लिश विंग्लिश’ बघितल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. ‘दबंग’सारख्या चित्रपटांपुढेही तो चालला. वास्तविक त्या चित्रपटात मानवी नातेसंबंधांशिवाय काहीच नाही. पण, अजूनही लोक गोष्टीला महत्त्व देतात, हे बघून बरं वाटलं. आईला गृहीत धरणारी मुलं आणि बायकोला गृहीत धरणारा नवरा, आणि या सगळ्यांना आपलं महत्त्व पटवून देणारी एक बाई एवढी साधी सरळ गोष्ट आहे त्या चित्रपटाची. माझ्या चित्रपटात तर घटस्फोटासारखा ज्वलंत विषय तरी आहे. त्यामुळे माझी साधी सरळ गोष्टही लोकांना आवडायला हरकत नाही, असा विचार नक्कीच होता. पण मराठी प्रेक्षकांनी गेल्या काही वर्षांमध्ये निदान माझ्या तरी बाबतीत सिद्ध केलंय की, त्यांना साध्या सरळ गोष्टी आवडतात. आधीच आपल्या अवतीभोवती खूप ताण आहे. त्यामुळे विकत घेऊन त्यांना दुखणं दाखवायचं नव्हतं. दोन पात्रांची गोष्ट आहे त्यामुळे ती तशीच साधी सोपी ठेवायची होती. अमिताभ बच्चनच्या काळात अमोल पालेकरांचे चित्रपट लोकांना आवडतच होते की! मग आताच्या काळातही साधी गोष्ट का नाही चालू शकत? – सतीश राजवाडे.
सतीश राजवाडे, दिग्दर्शक

मी प्रेक्षकच झालोय!
या गोष्टीवर पटकथा आणि संवाद लिहिण्याआधी मी काही संशोधन वगैरे केलं नव्हतं. पण माझ्या घरात अशी परिस्थिती आहे. माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. नात्याविषयी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवांतून गेलो आहे. प्रेमाच्या आणि ते तुटण्याच्याही. त्या अर्थाने संशोधनाची गरज पडली नाही. माझ्या आईवडिलांच्या बाबतीत झालेलं खूपच कडवट होतं. पण त्या कडवटपणातून किती घ्यायचं, हे मला माहीत होतं. मी त्यातून इतक्या वर्षांत जे काही घेतलंय, ते या गोष्टीत आलंय. आता माझंही लग्न झालं आहे. मीसुद्धा एका नात्याच्या बांधीलकीत आहे. बांधीलकी, समजूतदारपणा, एकमेकांमधला ताण, एकमेकांना आपापली जागा देणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार मी करतच होतो. सुदैवाने हा विषय माझ्या हातात आला. पण तो सतीश आणि अतुलमुळे आला. मग मनात दडलेल्या अनेक गोष्टी सहजपणे कागदावर उतरल्या. आता चित्रपट पाहताना ते जाणवतंय. आता मी प्रेक्षक होऊन गेलो आहे, मी चित्रपटाचा लेखक राहिलेलो नाही.
चिन्मय केळकर

पहिलेपणाची गंमतच न्यारी!
मराठी चित्रपट करायचा होता. आणि हा चित्रपट करायला मिळाला, ते मला खूप आवडलं. माझी भूमिका खूपच मस्त आहे. ती खूप सुंदर आहे. या गोष्टीत काही नाटकीपणा नाही. ही एक साध्या लोकांची साधी गोष्ट आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून मला ही गोष्ट करायला खूप मजा आली. मला काही फार तयारी करणंच शक्य नव्हतं. नैसर्गिकरीत्या ती गोष्ट जशी घडत गेली, तेच जास्त चांगलं होतं. – सागरिका घाटगे
हिंदी-मराठी?? तुलनाच नको!!
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टींमध्ये तुलना करणं, हेच चूक आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गेली अनेक वर्षे आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीची कालमर्यादा खूप कमी आहे. मराठी चित्रपटसृष्टी आता हळूहळू वर येत आहे. पण मला मराठीत काम करताना मिळालेली वागणूक ही हिंदी चित्रपटसृष्टीतल्यासारखीच होती. माझ्यासाठी माझी भूमिकाच खूप महत्त्वाची होती. मला हिंदी चित्रपट करत असल्यासारखंच वाटलं.
सागरिका घाटगे

कल्पना आणि वास्तव
सध्या जे घडतंय त्याचा आढावा गोष्ट लिहायच्या आधी सतीशनं घेतला होता. नवीन लग्न झालेल्यांपैकी मराठी कुटुंबांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत असल्याचं त्याला आढळलं. आकडेवारी पाहिली, तर ४५ टक्के मराठी जोडप्यांचा घटस्फोट होतो. मुंबई-पुणे या भागात हा सगळा प्रकार जास्त वाढला आहे. म्हणजे हा विषय आधीच समाजात खोलवर गेला आहे. मग सतीशने आकडेवारी वगैरे न देता जे घडतंय ते दाखवण्यावर जास्त भर दिला. विशेष म्हणजे मनोरंजन ही एक जबाबदारी आहे हे सतीशने आपल्या प्रत्येक कलाकृतीतून दाखवून दिलं आहे. त्यामुळे हा चित्रपट करतानाही जबाबदारी होती. भांडणं झाल्यानंतर वेगळं होताना त्यात केवळ ते जोडपंच नाही, तर त्यांची कुटुंबंही अध्याहृत असतात. सतीशच्या गोष्टीतल्या जोडप्याला मूल नाही. पण ज्यांना मुलं असतात, त्यांच्या बाबतीत हा प्रकार अधिकच भयानक असतो. त्या मुलांवर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. समाज काय म्हणेल वगैरे प्रकरण या गोष्टीत आणण्याच्या फंदात सतीश आणि चिन्मय दोघंही पडले नाहीत.

‘गोष्ट’ सरळ, साधी, सोपी नव्हती..
या गोष्टीची टॅगलाइन आत्ता जरी सहज, साधी, सरळ, सोपी गोष्ट अशी असली, तरी ती आत्ता दिलेली आहे. सुरुवातीला असं काही ठरलं नव्हतं की, ही सहज साधी सोपी गोष्ट असणार आहे. सतीश फार कमी बोलतो, पण जेव्हा बोलतो तेव्हा त्यातला इसेन्स समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याने गोष्ट सांगितल्यावर माझ्या मनात कुठेतरी ही सहज साधी सोपी गोष्ट आहे, हे खोलवर रुजलं होतं. कोणतंही नातं, विशेषत: नवरा बायकोचं किंवा स्त्री-पुरुषाचं नातं, हे खूपच गुंतागुंतीचं आणि खूप पापुद्रे असलेलं असंच असतं. ते खूप खासगी असतं. त्यामुळे हे गुंतागुंतीचं नातं सहज साध्या पद्धतीने मांडणं आव्हान होतं. ते मला लिहिता लिहिता जाणवायला लागलं. राम आणि सोनल ज्या वयोगटात आहेत, त्या वयोगटातील प्रेमाची हुरहुर, त्यांच्या आयुष्यातील ताण या सगळ्याची मांडणी करणं कठीण काम होतं. पण, सतीश आणि मी वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत राहिलो आणि त्याने मला दिशा दिली. तो खूप मोकळीक देऊन दिशा देतो. त्याने त्याच्या कल्पना मांडल्यानंतर त्याने चौकट दिली होती आणि त्या चौकटीत वावरण्याची मोकळीक मला दिली होती. त्याने त्याची दिशा सोडली नाही, आणि त्या चौकटीत वावरताना मी माझी मोकळीक सोडली नाही.

नाते अपुले ‘नात्याशी’
‘मुंबई-पुणे-मुंबई’सारखी अत्यंत फ्रेश प्रेमकथा, त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्येही एक प्रेमकथा या दोन प्रेमकथांनंतर पुन्हा प्रेमाची गोष्टच सांगणाऱ्या सतीशच्या मते आता त्याची प्रेमाबद्दलची समजही खूप प्रगल्भ झाली आहे. सतीशला स्वत:ला नातेसंबंधांच्या गोष्टी सांगायला खूप आवडतं. प्रत्येक माणसाला नातेसंबंधांची गोष्ट बघायची असते कारण ही गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटते, असं सतीशचं म्हणणं! त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या सहाही चित्रपटांत मानवी नातेसंबंध खूप महत्त्वाचे होते.
सतीशला स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधील गमंत लवकर कळते. पण प्रत्येक वेळी या नातेसंबंधांची एक वेगळी चौकट घेऊन नवनवीन प्रकार हाताळण्याची काळजीही सतीश घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर, प्रत्येक वेळी आपल्याला वेगळं पुस्तक वाचायचं असतं. त्याचप्रमाणे यालाही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचे असतात.