नियोजित अध्यक्ष कोत्तापल्ले यांचे मत

एक चित्रपट बुडाला तर काही कोटी रूपये बुडीत खाती जमा होतात. त्या पाश्र्वभूमीवर सरकारकडून साहित्य संमेलनाला होणारी २५ लाख रूपयांची मदत ही किरकोळ बाब आहे, मात्र त्याचा डांगोराच फार पिटला जातो, असे स्पष्ट मत चिपळूण येथे जानेवारीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
बीडहून पुण्याला जाताना नगरमध्ये कवी लहू कानडे यांच्या निवासस्थानी काहीवेळ थांबलेल्या कोत्तापल्ले यांनी निवडक पत्रकारांबरोबर अनौपचारिकपणे संवाद साधला. त्यात त्यांनी अनेकविध विषयांवर मते व्यक्त केली. संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला काही वाद निर्माण करायचा नाही असे स्पष्ट करून कोत्तापल्ले यांनी राजकारण्यांची मदत संमेलनासाठी घेणे न घेणे ही बाब किरकोळ आहे, तुम्ही त्यांना ठामपणे काही सांगू शकता का हे महत्वाचे आहे, असे मत व्यक्त केले.
जागतिकीकरणामुळे फक्त साहित्यिकच काय, सगळा समाजच आत्मकेंद्रीत झाला आहे. समाजातील चळवळी लुप्त झाल्या आहेत, त्यामुळेच सामाजिक विषयांवर साहित्यिक बोलत नाही, हे खरे असले तरी समाजातील कोणीच काही बोलत नाही हे खरे वास्तव आहे. पुन्हा साहित्यिकांनीच का बोलायचे, समाजात अनेक घटक आहेत, तेही शांतच आहेत. मुळात ज्यांच्यावर अन्याय होतो, ज्यांना त्रास होतो ते काहीच बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. वेळ आली तर जातीपातीचा, पैशाअडक्याचा संदर्भ लावत अन्याय करणाऱ्यांच्याच मागे उभे राहतात, त्यातून समाजात एक प्रकारचा अदृष्य दहशतवाद निर्माण झाला आहे, असे निरीक्षण कोत्तापल्ले यांनी नोंदवले.
स्वातंत्र्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती व आताची परिस्थिती यात फार अंतर आहे. त्यावेळी शत्रू निश्चित होता, त्यामुळे त्याच्याविरोधात लढणे सोपे होते. आता आपलीच माणसे सगळीकडे आहेत. राज्यकर्तेही तेच आहेत. शेतकऱ्यांची मुले आहेत. म्हणूनच लढाई सोपी नाही. इंग्रजांशी आपला काही संबंध नव्हता, यांच्याशी विविध स्तरावरचा संबंध आहे. म्हणून समाजाची चौकट कशी आहे यालाही महत्व आहे.
पूर्वी एखादी कविता जनजागृती करत होती, आता मुळात तशी कविता लिहायची कशी, लिहिली तर वाचली जाईल का, वाचली गेलीच तर त्यामुळे कोणी दुखावतील का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळेच मर्यादा येऊन सामाजिक चळवळी लुप्त होत चालल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असे कोत्तापल्ले म्हणाले.
प्रबोधनाची परंपरा राहिली नाही हे खरेच आहे. एखाद्या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होण्यापेक्षा संपूर्ण समाजाचा विचार करून व्यक्त होणे थांबलेच आहे. याला कारण आता चळवळीच उरल्या नाही, हे आहे. कोणासाठी आणि कोणाच्या विरोधात किंवा बाजूनेही व्यक्त व्हायचे असा प्रश्न आहे. समाज आत्मकेंद्रीत झाला आहे. हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. मी, माझे, यापलिकेडे कोणी पहात नाही. विचारवंत राहिले नाहीत. विशिष्ट ध्येय घेऊन काम करणारी माणसे नाहीत असे नाही, पण ती अपवादात्मक आहेत, मात्र याचा दोष फक्त साहित्यिकांना देता येणार नाही, समाजातील सर्वच घटक याला जबाबदार आहेत, त्यात साहित्यिकही आले, असे मत कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
कोणत्याही समाजात दर १०० वर्षांनी परिवर्तन होत असते, मात्र त्यासाठी समाजात फार मोठी खदखद निर्माण व्हावी लागते. देशाचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतरची १०० वर्षे म्हणजे सन २०४७ साली असे परिवर्तन होईल. त्यासाठीची खदखद सुरू झालेली दिसते आहे, मात्र ती सुफल होण्यासाठी वाट पहावी लागेल, तसे होईल हे मात्र नक्की आहे, असा आशावाद कोत्तापल्ले यांनी व्यक्त केला. कानडे परिवाराच्या वतीने, तसेच शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक संजय कळमकर, भगवान राऊत, शर्मिला गोसावी, प्रा. सुधाकर शेलार, विलास साठे, अशोक कानडे आदी उपस्थित होते.