विदर्भ विकलांग संघर्ष समितीतर्फे अपंगांच्या आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्या मागण्यांचे शासनाने निरसन करावे आणि न्याय द्यावा, ही मागणी करीत आलेल्या अनेक अपंगांना आणि अंगणवाडी-बालवाडीमधील शेकडो महिला कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये टेकडी मार्गावर रस्त्यावर उघडय़ावर रात्र काढाली लागली. सारे मंत्रिमंडळ आणि प्रशासन नागपुरात असताना त्यांच्याकडे बघायला कोणाला वेळच नसल्यामुळे त्यांची संवेदनशीलता हरपली आहे का, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निघालेल्या तीन मोर्चांपैकी विदर्भ विकलांग संघर्ष समिती आणि हे दोन्ही संघटनांच्या मोर्चासमोर संबंधित मंत्र्यांनी येऊन निवेदन स्वीकारले आणि दरवर्षीप्रमाणे आश्वासन देऊन परतले. वर्षांनुवर्ष असाच प्रकार सुरू असल्यामुळे दोन्ही संघटनांच्या मोर्चांनी टेकडी रोडवर ठाण मांडले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हटायचे नाही, असा पवित्रा घेत शेकडो महिलांनी रस्त्यावर थंडीच्या कडाक्यात बसल्या होत्या. विविध जिल्ह्य़ातून आलेल्या या महिलांनी रस्त्यावर आराम केला. रात्रभरात प्रशासनाचा एक तरी अधिकारी किंवा मंत्री येईल, या आशेने या महिला वाट पहात होत्या. मात्र, रात्र उलटून गेली तर एकही मंत्री मोर्चाकडे फिरकला नाही. महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड व सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारून छोटेखानी भाषण देत मोर्चेक ऱ्यांना आश्वासन दिले आणि ते पुन्हा परतले नाही.
विदर्भ विकलांग संघर्ष समिती गेल्या दहा वर्षांपासून अंध-अपंगांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा नेतात. मात्र त्यांना दरवर्षीच त्यांची केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जाते. प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यावर्षी त्यांनी न्याय मिळाल्याशिवाय हटायचे नाही, असा पवित्रा घेत तेही सीताबर्डी टेकडी रोडवर ठाण मांडून बसले. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत नाही तोपर्यंत हटायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि सोमवारी दुपारी आलेला अपंगांचा मोर्चा मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत टेकडी पॉईंटवर ठाण मांडून बसला होता. केवळ मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटायचे आहे, असा अपंग संघटनेने पवित्रा घेतल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची पंचाईत झाली होती. अपंग संघटनेने आपल्या सहकाऱ्यांसाठी खाण्यापिण्याची सोय केली होती. मात्र, ती पुरेशी नसल्यामुळे अनेकजण उपाशी रात्रभर बसले होते. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी टेकडी मार्गावरील फुटपाथवर आणि डांबरी रस्त्यावर रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यानंतर मोर्चेक ऱ्यांनी मंत्र्यांना भेटण्यासाठी अनेक पोलिसांमार्फत निरोप पाठविले. मात्र, ना सरकारला  त्यांची चिंता ना प्रशासनाला आहे. रात्रभर बसलेल्या दोन महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्या न्याय मागण्यांसाठी आलेल्या लोकांना प्रशासनाकडून अशा पद्धतीने त्रास दिला जात असताना कुठे गेली गोरगरिबांसाठी असलेली सरकारची संवेदनशीलता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.