वाळू तस्करीत सापडलेला उपजिल्हाधिका-यांचा वाहनचालक विजयानंद घाडगे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद होऊन त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी निलंबित केले.
घाडगे हा उपजिल्हाधिकारी शहाजी पवार यांचा वाहनचालक असून तो महसूल विभाग वाहनचालक संघटनेचा अध्यक्षही आहे. परंतु त्याच्या पत्नीच्या मालकीच्या मालमोटारीचा वापर करून घाडगे हा बेकायदेशीरपणे वाळूची तस्करी करताना सापडला. त्याच्याविरूध्द दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी धाड घालून कारवाई केली होती. या गुन्हयाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी घाडगे यास निलंबित केले असून त्याशिवाय त्याचा वाहन परवाना आणि मालमोटारीची नोंदणी रद्द करण्याचे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना देण्यात आले आहे. तसेच ७७ हजार ५०० रुपये दंड भरण्याची नोटीसही घाडगे याच्या घरावर डकविण्यात आली आहे.