केंद्र सरकारच्या योजनेनुसार शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आणि शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वानवा असल्यामुळे विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने अग्निशमन विभागातील पदभरतीला हिरवा कंदील दिला. या संदर्भात सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव येत्या सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार आहे.
मुंबईतील घटनेनंतर शहरातील अग्निशमन विभाग जागृत झाला आहे. नागपूर महापालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अपुरी संख्या बघता अनेकदा शहरात आगीच्या किंवा इमारत कोसळण्याच्या मोठय़ा घटना घडताच त्यांची दमछाक होते. शहराची वाढती लोकसंख्या घेता महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाचे नवीन फायर स्टेशन तयार करणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे अग्निशमन विभागाने प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आणि तसा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे काळानुरूप अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी ८ नवीन अग्निशमन स्थानके असणे गरजेचे आहे. २५४ वाढीव पदे आणि जुने ५ फायर स्टेशन मिळून १३ स्थानकासाठी वेगवेगळी ६१७ पदे अस्थापनेवर मंजूर करण्याचा प्रस्ताव येत्या सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार आहे. शासनाने निर्देश केल्याप्रमाणे नवीन सेवाप्रवेश नियमांना सभेत मंजुरी मिळाल्यानंतर पदभरतीचा मार्ग मोकळा होईल.
नागपूर शहर विकास योजनेतील शेतकरी भवनाचे आरक्षण रद्द करून विस्तारित महाराजबाग या आरक्षणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरी भवनाचे बांधकाम केले. या जागेवर महाराष्ट्राचे प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार नवीन आरक्षण फेरबदल करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येणार आहे. शहरातील जलवाहिन्या नसलेल्या भागात तसेच पूर्व नागपुरातील शहराच्या बाहेरच्या पाणी टंचाई वस्त्यात १५० मि.मी. व ११५ मि.मी. व्यासाच्या विंधन विहिरी (बोअरवेल) खोदण्याचा कार्यक्रम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येणार आहे. यात विंधन विहिरीसाठी निवडण्यात येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण आणि प्रस्तावित खर्चाचा प्रस्तावाचा समावेश आहे.