विवेकानंदांचे चित्र असलेले नाणे सरकारने बाजारात आणावे, तसेच त्यांच्या तैलचित्राचे तिकीट पुन्हा प्रकाशित करावे, अशी मागणी स्वामी विवेकानंद सार्ध समितीचे अ. भा. सचिव प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी केली. स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पूर्ण वर्षभर देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विवेकानंदांचे विविध क्षेत्रांतील काम लक्षात घेऊन समाजातील सर्व स्तरांत त्यांचा विचार पोहोचावा, यादृष्टीने वर्षभर कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. १२ जानेवारीला विशाल शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. २५ डिसेंबरला कार्यकर्ते वर्षभराच्या कामासाठी संकल्प करणार आहेत. तो दिवस संकल्पदिन म्हणून जाहीर केला जाणार आहे. देशातील ३ कोटी घरांपर्यंत समितीचे कार्यकर्ते संपर्क करणार असून, प्रत्येक घरी विवेकानंदांचे चित्र मोफत दिले जाणार आहे.
१८ फेब्रुवारी २०१३ रोजी देशातील ३ लाख गावांत एकाच वेळी सूर्यनमस्कार घातले जाणार आहेत. हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणार आहे. ११ सप्टेंबर २०१३ रोजी स्वामीजींच्या शिकागो व्याख्यानाच्या स्मृतीनिमित्त भारत जागो युवा दौडीचे आयोजनही केले जाणार आहे. तसेच देशातील विविध विद्यापीठांतील कुलगुरूंची परिषद घेतली जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान मंडळाने महाविद्यालयांना विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यास सांगितले असून, त्यासाठी आर्थिक साहाय्यही देण्यात आले आहे. ग्रामायण उपक्रमात ग्रामीण भागातील सुमारे ३५०० गावांत विवेक ग्रामयोजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला, पाणी, पर्यावरण या विषयांवर भर देऊन उपक्रम घेतले जातील. जगातील २२ देशांत विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमांची योजना केली जाणार आहे. लातूर येथील अभाविप व विवेकानंद संस्कार केंद्राच्या वतीने विवेकानंद ज्योत यात्रेचे आयोजन केले आहे. कन्याकुमारीहून युवाज्योत आणण्यासाठी १५० युवक जाणार आहेत. ९ जानेवारीला कन्याकुमारी येथे प्रज्वलित केलेली ज्योत १२ जानेवारीला लातूरला येईल.