राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील परिचारिका विविध मागण्यांसाठी २४ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसेवा कोलमडणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यात २३ विविध शासकीय रुग्णालयात २३ हजार आणि विदर्भात ८ हजारच्या जवळपास परिचारिका आहेत. जिल्हा आरोग्य केंद्र आणि कंत्राटावर असलेल्या परिचारिका या संपात सहभागी होणार आहेत.
मधल्या काळात अनेक परिचारिकांना झालेली मारहाण, त्यांच्या वसतिगृहात चोरीचे झालेले प्रकार यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय परिचारिकांच्या मानधन आणि वेतनासंदर्भात सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मधल्या काळात आंदोलने, निदर्शने करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आजही राज्य आणि केंद्राच्या वेतनात ५ ते ८ हजार रुपये इतकी तफावत आहे. याशिवाय वेतनश्रेणी, सेवानिवृत्त विमा योजना, रुग्णांसाठी लागणारे साहित्य, जनरस नर्सिगचे प्रशिक्षण सुरू करणे, बंधपात्रित शासन निर्णय त्वरित रद्द करणे, भारतीय चर्चा परिषदेने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सर्व स्तरातील पदे निर्माण करून ते त्वरित बंद करणे इत्यादी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
या संपाबाबत बोलताना महाराष्ट्र गव्‍‌र्हमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष कल्पना विंचुरकर यांनी सांगितले, यापूर्वी सरकारकडे परिचारिकांच्या मागण्यासंदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आली आहेत. नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील परिचारिकांचा मोर्चा काढून सरकारला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही.
 रुग्णांची सेवा करताना परिचारिकांना काय त्रास सहन करावा लागतो याची सरकारला फिकीर नाही. अनेक रुग्णालयांमध्ये साधने नसल्यामुळे परिचारिकांना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रास देत असतात. प्रसंगी अनेकदा मारहाण करीत असतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. परिचारिकांना कुठलीच सुरक्षा नाही. संप सुरू होण्यापूर्वी  सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील पारिचारिका बेमुदत संपावर जाणार आहे. रुग्ण सेवा विस्कळीत होईल याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्यासंदर्भात सरकारने विचार केला पाहिजे. या संपामध्ये परिचारिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.