इंग्रजी शाळांची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या नावाखाली एकामागोमाग एक इंग्रजी शाळांच्या प्रस्तावांना मान्यता देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला आपल्या मराठी शाळांचा मात्र विसर पडला आहे.पालिकेच्याच नव्हे तर सर्व अनुदानित व विनाअनुदानित मराठी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग अर्थात बालवाडय़ा सुरू करण्याची मागणी पालिकेच्याच शिक्षण समिती सदस्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, निधी असतानाही या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून एकामागोमाग एक इंग्रजी शाळा त्याही पूर्व प्राथमिक वर्गासह सुरू करण्यालाच पालिका प्रशासन प्राधान्य देत असल्याचा आरोप होतो आहे.पूर्व प्राथमिक शिक्षणाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन पालिकेच्या शिक्षण समितीच्या मे महिन्यात झालेल्या बैठकीत मनपाच्या सर्व मराठी व इतर भाषिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी म्हणून प्रशासनाकडे पाठविण्याबाबत निर्णय झाला होता. त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. त्यात आता पालिकेने २०१५-१६ पासून वीस ठिकाणी पूर्व प्राथमिक वर्गासह इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. या आधीही पालिकेने आपल्या काही इंग्रजी शाळांच्या प्रस्तावांना धडाधड मान्यता दिल्या होत्या. इंग्रजी शाळांबाबत ज्या उत्साहाने पालिका निर्णय घेत आहेत तसा उत्साह सध्या अस्तित्वात असलेल्या मराठी शाळांमध्ये बालवाडय़ा सुरू करण्याबाबत का घेत नाही, असा सवाल पालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी केला आहे.पालिकेच्या स्वत:च्या ३६८ मराठी शाळा आहेत. त्यापैकी १८४ ठिकाणी गेल्या १० वर्षांपासून पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याची मुभा काही समाजसेवी संस्थांना दिली गेली आहे. या ठिकाणी ५०४ बालवाडी वर्ग पालिका समाजसेवी संस्थांमार्फत चालविते. मात्र सर्वच ठिकाणी पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी पूर्व प्राथमिकच्या वर्गाची आवश्यकता आहे. याशिवाय मराठी माध्यमाच्या २१० खासगी प्राथमिक शाळांना पालिकेचे अनुदान मिळते. तर ५९ मराठी शाळा या विनाअनुदानित तत्त्वावर चालतात. या शाळांमध्येही पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी दराडे यांनी केली आहे.

वेतनाबाबतही सापत्न वागणूक
पालिकेच्या माध्यमातून ६० ठिकाणी सुरू असलेल्या शिशु वर्गामध्ये काम करणाऱ्या शिक्षक व सेवकांना पाच हजार रुपये इतके वेतन दिले जाते. मात्र, इतर माध्यमाच्या शिशु वर्गात काम करणाऱ्या शिक्षक व सेवकांना तीन हजार एवढेच वेतन दिले जाते. याशिवाय इंग्रजी माध्यमाचे शिशु वर्ग चालविण्याची मक्तेदारी फक्त चारच संस्थांना का, असा सवालही उपस्थित केला जातो आहे.
मराठी टक्का वाढवायचा तर..
पालिकेच्या विविध माध्यमांपैकी मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या ही सर्वात जास्त होती. परंतु, आता ही विद्यार्थी संख्या अवघी ६३,३३५ वर आली आहे. पालिकेच्या मराठी शाळांमधील टक्का वाढवायचा असेल तर पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याला प्राधान्य द्यायला हवा. त्यामुळे, मराठी शाळांमध्येही पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होईल.