10 April 2020

News Flash

दुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकार गंभीर नाही; विरोधकांचा आरोप

राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामना करीत असताना व शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकारने प्रथम त्यासाठी पॅकेज जाहीर करावे व मग त्यावर सभागृहात चर्चा व्हावी,

| December 10, 2014 07:56 am

राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामना करीत असताना व शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकारने प्रथम त्यासाठी पॅकेज जाहीर करावे व मग त्यावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी आमची मागणी होती. मात्र, सरकार या प्रश्नाबाबत गंभीर नसून वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. जोपर्यंत सरकार पॅकेज घोषित करीत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला.
दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभराकरिता स्थगित झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने प्रथम दुष्काळग्रस्तांकरिता पॅकेज जाहीर करावे. त्यानंतर, त्यावर चर्चा करून काही सूचना करता येणे शक्य होते. जनतेने भाजपवर विश्वास टाकला आहे व त्यांना निवडून दिले आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना आर्थिक मदत जाहीर करून त्यापासून त्यांना परावृत्त करणे, ही प्राथमिकता असायला हवी होती. आज पॅकेज जाहीर करण्याची सरकारला चांगली संधी होती. राज्य व केंद्र अशा दोन्ही सरकारांनी दुष्काळग्रस्तांसाठी कुठलीही मदत दिलेली नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे पवार यावेळी म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला. राज्यातील शेतकरी व सामान्य जनता दुम्ष्काळाच्या झळा सोसत असताना आता चर्चेची नाही तर प्रत्यक्ष मदत जाहीर करण्याची गरज आहे. यासंदर्भात शासनाने जो ठराव आज मांडला त्यातील भाषा खचितच न्याय देणारी नव्हती, अशी टीका करीत विखे पाटील यांनी तातडीने पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.
विरोधी पक्ष म्हणून दुष्काळाच्या प्रश्नावर आम्ही मांडलेल्या ठरावावर चर्चा न घेता, सरकारने स्वत:च्या ठरावावर चर्चा घेण्याची तयारी दाखविली. राज्यातील कापूस, धान, सोयाबीन, मका उत्पादक शेतकरी तसेच दूध उत्पादक हे संकटात आहेत. विरोधी पक्ष म्हणून हे विषय मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. शेतक-यांचे नुकसान होऊ नये, म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणणार असून त्यासंदर्भात राष्ट्रवादीशी देखील आमचे बोलणे सुरू आहे. शेतक-यांना मदत देण्याची या सरकारची मानसिकता नाही आणि मदत जाहीर करेपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही, असे माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, उपनेते विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, रणजीत कांबळे व इतर नेते उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2014 7:56 am

Web Title: government is not serious about drought in maharashtra
Next Stories
1 विदर्भासह मराठवाडय़ातीलही रुग्णांसाठी ट्रॉमा केअर सेंटर केव्हा सुरू करणार?
2 मोर्चा नसलेला दिवस;विधानभवन परिसर शांत
3 संत्र्याचे नुकसान; ३५ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत द्या – सुनील शिंदे
Just Now!
X