काळीज दिलंय पोरी तुला गं आंदण
जमेल तेवढं पाड ना सासरी चांदण
यांसारख्या नेमक्या शब्दांतून पित्याच्या हृदयातील वात्सल्य, कारुण्य यांचे समग्र दर्शन घडवित रसिकांच्या हृदयाचा ठाव कवी प्रा. विलास पगार यांनी घेतला. त्यासाठी निमित्त ठरले येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या काव्य मैफलीचे. या मैफलीत पगार यांच्या कवितांनी सर्वानाच विचारमग्न केले. ग्रामीण भागातील सामाजिक व कौटूंबिक परिस्थिती त्यांनी काव्याव्दारे मांडली.
आपण केवळ शरीरानेच शहरात राहतो. मन मात्र गावाकडच्या पायपाटा, शेती आणि मातीकडेच ओढ घेत राहते. तिथले कष्ट ं व्यथीत करत असल्याचे प्रा. पगार यांनी नमूद केले.
बापांच्या हातांना नांगराचे फोड
मायच्या पायांना धस्कटांचे वेड
कर्जाचे उन्हाळे बापाला झोंबती
वैशाख वणवा मायेच्या सोबती
यांसारख्या कवितांनी रसिकांना पूर्णपणे हेलावून सोडले. अतीव वाचनवेड असलेल्या कवी पगार यांनी आज आपण जे काही आहोत. ते कवितेमुळेच असे नमूद केले. कविता ही अंतर्मनातून उमलून यावी लागते. तिला ओढून ताणून आणता येत नाही. आणि आणली तरी तिचा कृत्रिमपणा मनाला भावत नाही, असे सांगताना आपल्या आईचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
माय अडाणी, अडाणी तरी शिकवले सारे
तिचे ऋणही फेडण्यास सात जन्मही अपुरे
या शब्दांत त्यांनी आईची महती वर्णन केली. वाचनालयाचे सचिव हेमंत पोतदार आणि कवी विवेक उगलमुगले यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना बोलते करत कविचे अंतरंग हळूवार व प्रभावीपणे रसिकांसमोर उलगडले. ‘व्यासपीठ’चे संपादक हेमंत पोतदार यांनी प्रा. पगार यांचा सत्कार केला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्तविक तर, कवी प्रशांत केंदळे यांनी आभार मानले. कवयित्री जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले. कायक्रमास प्रा. सुरेश मेणे, विजयकुमार मिठे, कवयित्री निशीगंधा घाणेकर, अलका कुलकर्णी, संजीवनी पाटील, अरूण इंगळे, रूपचंद डगळे आदी उपस्थित होते.