महिलांना स्वयंपूर्ण करण्यामागे बचत गट खूप उपयुक्त ठरत आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ातील महिला बचत गट अधिक शक्तिशाली व्हावेत, त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा, यासाठी जिल्ह्य़ातील बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू शासनाच्या विविध विभागांनी खरेदी कराव्यात असे धोरण आखता येईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी केले.
येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित गोंडवाना कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवात जिल्ह्य़ातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूपेश जयवंशी, पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक सुवेज हक, नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, समाज कल्याण सभापती बाजीराव कुमरे, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्रुला, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, प्रकाश ताकसांडे, बाबा हाशमी, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे आदी उपस्थित होते.
 बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांची राजकीय ताकदही वाढली आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक, आíथक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊन त्या सक्षम झाल्या आहेत. जिल्ह्य़ात ५ हजार ६०० बचत गट कार्यरत असून आणखी वाढवण्याची गरज आहे. येथील बचत गटांनी वनावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग उभारल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ज्या वस्तूंना बाजारात मागणी आहे, त्यासाठी बचत गटांना मार्गदर्शन व वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे आर.आर. पाटील म्हणाले.  
गडचिरोली जिल्ह्य़ात विविध कलागुण आहेत. त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत. बचत गटांचा जिल्हा महासंघ निर्माण केल्यास वस्तूंना योग्य तो भाव मिळवता येईल, असे आमदार डॉ. उसेंडी म्हणाले.
 प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी, तर आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभू राजगडकर यांनी मानले.