स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून त्याऐवजी व्हॅटच्या माध्यमातून कर वसूल करावा, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासंदर्भात राज्यातील २६ महापालिका क्षेत्रांतील लघु उद्योजकांची बैठक शुक्रवारी दुपारी १ वाजता ठाणे येथील टिसाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आणि विक्रीकर विभागाचे आयुक्त नितीन करीर उपस्थित राहणार असून ते यासंबंधी व्यापाऱ्यांची मते जाणून घेणार आहे.
तसेच या करासंबंधी शासनाची भूमिका व्यापाऱ्यांपुढे स्पष्ट करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी एलबीटी रद्द करण्याविषयी चर्चा केली होती. तसेच शुक्रवारी यासंबंधी व्यापाऱ्यांची बैठक होणार असल्याचेही सांगितले होते. त्याच वेळी पवार यांनी श्रीवास्तव आणि करीर यांना या बैठकीला जाण्याचे आदेश दिले होते.