अपारंपरिक ऊर्जास्रोतांचे संवर्धन करण्यासाठी लोकांनी इमारती आणि कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले आहे. मुलांमध्ये सौरऊर्जेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित ‘महासूर्यकुंभ’ या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी हे सांगितले.
 काळानुसार एलपीजी गॅससारखे अपारंपरिक ऊर्जास्रोत संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन करायचे असेल, तर सौरऊर्जेसारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. सौरऊर्जेचे महत्त्व शाळकरी मुलांना पटवून देण्यासाठी गुरुवारी मुंबईतील वांद्रे येथे ‘महासूर्यकुंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुंबईच्या विविध भागातील शेकडो मुलांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्याधर राव यांनी केले.
यावेळी भारताला भरपूर सूर्यप्रकाशाची देणगी लाभली आहे आणि त्याचा मोठय़ा प्रमाणामध्ये वापर करून घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सोसायटय़ा आणि कार्यालयांमध्ये अनेक कामांमध्ये सौरऊर्जेचा कुशलतेने वापर करणे शक्य असते.
त्यामुळे नागरिकांना या सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमादरम्यान शाळकरी मुलांना सौरऊर्जेचा वापर करून नुडल्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.