आदिवासी भागात सौर दिवे आणि सौरपंपाच्या उपयोगाबाबत जनतेत जागृती निर्माण करावी आणि काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर सौर प्रकल्प हाती घेण्यात यावेत, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते
बोलत होते.
या वेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमह सिंह आदी उपस्थित होते. प्रायोगिक  प्रकल्पामुळे सौरऊर्जेबाबत जनतेला माहिती होईल आणि शेजारच्या गावांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. ‘मेडा’सारख्या संस्थाद्वारे सौर प्रकल्पांसाठी तांत्रिक सहाय उपलब्ध होऊ शकते. शिक्षणामुळे आदिवासी मुला-मुलींच्या जीवनात परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त करताना आश्रमशाळांतील सद्य:स्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना नाही, त्या ठिकाणांची माहिती संकलित करावी. त्यामुळे सुधारणा करण्याला चालना देता येईल, असे त्यांनी सूचित केले. आदिवासी मुला-मुलींना धनुर्विद्येचे उत्तम प्रशिक्षण दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू त्यातून पुढे येतील, असे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली कारवाई आणि आदिवासी विकास योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला.