दहीहंडी उत्सवात सहभागी होत असलेल्या गोविदांना भाजपाकडून विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. दहीहंडीचे मनोरे रचताना जखमी होणाऱ्या गोविंदांची समस्या गेली काही वर्षे सातत्याने समोर येत आहे. यावर्षी ‘भाजपा सुरक्षा कवच’ या योजनेअंतर्गत जखमी गोविदांना १५ हजार रुपये तर कायम अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये मिळतील.
ही विमा योजना १८ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहीहंडी मंडळांनी स्वत:च्या लेटरहेडवर गोविंदाचे नाव व वय ही माहिती स्थानिक भाजपा पदाधिकारी किंवा मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, तिसरा मजला, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व येथे (२४१८३२९०, २४१८३१४१) ३१ जुलै, संध्याकाळी ८.००पर्यंत आणून द्यावेत, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी दहीहंडी मंडळांना कोणताही खर्च येणार नाही.