स्वयंशिस्तीचा टेंभा मिरविणाऱ्या मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांनी ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या हरित जनपथांवरच जेवण आणि नाष्टय़ाच्या पंगती उठविल्याने येथील सौदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले. त्यामुळे ठिकठिकाणी पडलेल्या उष्टय़ा पत्रावळ्या आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमुळे हरित जनपथाला कचराकुंडीची अवकळा आली होती. हरित जनपथाच्या विद्रूपीकरणामुळे गोविंदा पथकांच्या बेशिस्तपणाच्या नमुन्याचे नवे दर्शन ठाणेकरांना यानिमित्ताने पाहायला मिळाले. दरम्यान, मंगळवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हरित जनपथावर साफसफाई करून पत्रावळ्या आणि रिकाम्या बाटल्यांचे ढीग जागोजागी जमा करून ठेवल्याने मॉर्निग वॉकला आलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
ठाणे शहरातील मोठमोठय़ा रकमेच्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी सोमवार सकाळपासूनच मुंबई तसेच ठाणे परिसरातील गोविंदा पथके शहरात फिरत होती. मात्र या पथकांच्या वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांच्या वाहनांना शहरात प्रवेश बंदी लागू केली होती. तीनहात नाका, नितीन कंपनी आणि हरिनिवास अशा प्रवेशद्वारावरच गोविंदा पथकांची वाहने अडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. तसेच गोविंदा पथकांची वाहने उभी करण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर व्यवस्था करून देण्यात आली होती. त्यामुळे या सेवा रस्त्यांवर गोविंदा पथकांचे ट्रक आणि बस गाडय़ा दिवसभर उभ्या होत्या.
ठाणे महापालिकेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील तीनहात नाका ते नितीन कंपनीदरम्यान हरित जनपथ तयार केले आहेत. महामार्ग आणि सेवा रस्त्याच्या मधोमध हरित जनपथ आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांवर वाहने उभी केलेल्या अनेक गोविंदा पथकांनी या हरित जनपथाचा नाश्ता आणि जेवणाच्या कार्यक्रमासाठी वापर केला. जनपथावरील गवतावर गोविंदांचे जथ्थेच्या जथ्थे मांडी घालून जेवण आणि नाश्ता करताना दिसून आले. मात्र जेवण आणि नाश्त्याच्या कार्यक्रमानंतर गोविंदा पथकांनी उष्टय़ा पत्रावळ्या आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सर्वत्र पडलेल्या पत्रावळ्या आणि रिकाम्या बाटल्यांमुळे हरित जनपथाला कचराकुंडीचे रूप आले होते. एकंदरीतच हरित जनपथाची दुर्दशा पाहून गोविंदा पथकांच्या बेशिस्तपणाच्या नमुन्याचे दर्शन ठाणेकरांना सोमवारी घडल्याचे दिसून आले.

डोंबिवलीतही दुर्दशा..
श्रीकृष्णाचे अवतार म्हणून गोविंदा पथकांच्या माध्यमातून शहरात फिरणाऱ्या गोविंदांनी पालिकेच्या डोंबिवली क्रीडासंकुलाच्या आवारात शिजलेले अन्न, पत्रावळी, थर्मोकोलची ताटे अस्ताव्यस्त फेकून देऊन खेळाच्या मैदानाची दुर्दशा केली. मंगळवारी सकाळी क्रीडासंकुलात सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या घाणीचा सामना करावा लागला.
श्रीकृष्णाने जीवनाचे तत्त्वज्ञान सांगताना कोठे बेशिस्त वागा, सार्वजनिक ठिकाणी घाण करा, असे सांगितले नाही. मग गोविंदा पथकांना क्रीडासंकुलात नागरिक, खेळाडूंच्या वाटेवर घाण करण्याची परवानगी कोणी दिली, असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. डोंबिवलीतील दहीहंडय़ा फोडण्यासाठी ठाणे, मुंबई, कल्याण परिसरातील गोविंदा पथके बस, ट्रक, टेम्पो घेऊन दिवसभर शहरात आली होती. दहीहंडय़ा फोडल्यानंतर शहरातून बाहेर पडताना गोविंदा पथकांनी वाहने उभी करण्यासाठी सुयोग्य वाहनतळ व बसण्यासाठी आरामात जागा मिळाल्याने घरडा सर्कलजवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात तळ ठोकला होता. या वेळी थकलेल्या गोविंदांनी क्रीडासंकुलातील पदपथ, आसनव्यवस्थेवर बसून भोजनाचा, खाऊचा स्वाद घेतला, पण खाऊन झाल्यानंतर उरलेले सगळे अन्न पदपथ, पायऱ्यांवर टाकून दिले. प्लॅस्टिक, थर्मोकोलच्या पत्रावळी, कप क्रीडासंकुलात अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आले आहेत. सकाळी पदपथावर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना या घाणीचा सामना करावा लागला.
पुढील वर्षी पालिकेने गोविंदा पथकांना क्रीडासंकुलात प्रवेश देऊ नये, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. भोजन करायचे आहे, असे सांगून गोविंदा पथके क्रीडासंकुलाच्या आवारात घुसली. ते अशी घाण करतील असे वाटले नाही, असे क्रीडासंकुलातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.