न्यायालयाने दहीहंडी उत्सवाबाबत धोरण आखण्याचे आदेश दिल्यानंतर स्थापन केलेल्या समितीच्या बैठकांना झालेला विलंब, सादर झालेल्या अहवालाबाबत अद्याप न घेतलेला ठोस निर्णय यंदा गोविंदा पथकांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. दहीहंडीबाबतच्या धोरण दिरंगाईमुळे यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागण्याची शक्यता आहे. मात्र यंदाचा दहीहंडी उत्सव अपघातविरहित व्हावा यासाठी गोविंदा पथके जोमाने सरावाला लागली आहेत.
दहीहंडी फोडताना थर कोसळून होणारे अपघात लक्षात घेऊन न्यायालयाने गेल्या वर्षी या उत्सवावर काही बंधने घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन गोविंदा पथकांनी गेल्या वर्षी दिलासा मिळविला होता. मात्र दहीहंडी उत्सवाबाबत धोरण आखण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यासाठी राज्य सरकारने समितीही नेमली होती. अलीकडेच बैठका घेऊन समितीने अहवाल तयार करून तो सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडे सादर केला. मात्र हा अहवाल अद्यापि गुलदस्त्यातच आहे.
येत्या ६ सप्टेंबर रोजी गोपाळकाला असून या दिवशी मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी उंच मानवी थर रचून दहीहंडी फोडण्यात येणार आहे. मात्र अद्याप दहीहंडीबाबतचे धोरण जाहीर न झाल्याने गोविंदा पथके संभ्रमातच आहेत. यंदा किती थर रचायचे, किती वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी उत्सवात सहभागी करायचे असे अनेक प्रश्न गोविंदा पथकांना पडले आहेत. तशीच अवस्था गल्लोगल्ली लाखमोलाची दहीहंडी बांधणाऱ्या आयोजकांची झाली आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत गोविंदा पथकांनी थरामध्ये १२ वर्षांवरील मुलांच्या सहभागाबाबत दिलासा मिळविला होता. त्यामुळे गेल्या वर्षी जल्लोशात हा उत्सव साजरा झाला. तसेच काही ठिकाणी १२ वर्षांखालील मुलांनीही दहीहंडय़ा फोडल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. राज्य सरकारने आतापर्यंत धोरण जाहीर न केल्यामुळे यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच दहीहंडी उत्सव साजरा होण्याची चिन्हे आहेत. गोविंदा पथकांनी आपल्या क्षमतेनुसार थर रचावेत, सराव नसताना विनाकारण पैशाच्या लोभाने उंच थर रचण्याच्या फंदात पडू नये, शक्यतो अपघात टाळावा, अशा सूचना मोठय़ा गोविंदा पथकांतील मंडळी मुंबई-ठाण्यातील पथकांना सध्या करीत आहेत. अपघातविरहित उत्सव साजरा झाल्यास त्याबाबत निश्चित करण्यात येणाऱ्या धोरणात दिलासा मिळू शकेल. अन्यथा जाचक नियमांचे पालन करण्याची वेळ येईल, अशी विनंती ही मंडळी अन्य गोविंदा पथकांना करीत आहेत.