शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या व कुत्रे पिसाळण्याच्या घटना वाढल्याने श्वानदंशांचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत असून सवरेपचार रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, सर्वच आरोग्य विभागांनी यावर लवकर उपाय न केल्यास हे जीवघेणे ठरू शकते, असे जाहीर केले आहे. श्वानदंशावर प्रभावी असलेल्या रेबीज या इंजेक्शनची उपलब्धता सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयात अधिक असल्याची माहिती मिळाली आहे.
मोकाट कुत्री वाहनांच्या मागे सुसाट धावत असल्याचे अनेक ठिकाणी घडत आहे.
प्रसंगी ही कुत्री वाहनचालकांचा चावा घेतात. इतकेच नव्हे, तर पादचाऱ्यांना चावा घेण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुत्रे पाहिले की भीती वाटावी असे वातावरण आहे.
अकोला महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवून बरीच कुत्री पकडून त्यांना गावाबाहेर सोडली होती. पण तरीही शहरात त्यांची संख्या काही कमी झालेली दिसून येत नाही.
कुत्रे चावल्यानंतर काही अपाय होऊ नये म्हणून रॅबीजविरोधी लस द्यावी लागते. ती महागडी असून खाजगी रुग्णालयात या लसीचा दर ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, काही खाजगी दवाखान्यांत मोठे फलक लावून या लसीची जाहिरात करताना कुत्र्याने नुसता ओरखडा जरी घेतला तरी तो जीवास घातक ठरू शकतो, असे दाखविण्यात आले आहे. कुत्र्याने पाय चाटणेदेखील धोकादायक ठरू शकते, असे आरोग्य विभागसुद्धा सांगत आहे.
पूर्वी कुत्रे चावले तर पोटात ११ ते १३ इंजेक्शन्स घ्यावी लागत. मात्र, आता संशोधन अधिक झाल्याने इतक्या इंजेक्शन्सची जरुरी नाही. केवळ रॅबीजविरोधी लस घेतली की काम होते. पण खाजगी रुग्णालयातील दर सर्वाना परवडत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांचा कारभार कसा चालतो, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला तेथे यमयातना सहन कराव्या लागतात.