देशातील आर्थिक संकटाला आंतररराष्ट्रीय धोरणांबरोबरच आपल्या सरकारचे धोरणही कारणीभूत आहे. त्यात बदल करून उपाय शोधल्यास देश आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल असे प्रतिपादन भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेचे अध्यक्ष व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एम. एम. पुलाटे, प्रवरा अभिमत विद्यपीठाचे कुलगुरु डॉ. शशांक दळवी, प्राचार्य बी. के. सलालकर, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. जे. आर भोर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रा. थोरात म्हणाले, देशात आदिवासी, दलित समाज गरीब असून त्यांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी चांगला स्वयंरोजगार देण्याची गरज आहे. त्यासाठी रोजगार वाढविणारा विकास हवा. शेती सोडून जे लोक नरेगा योजनेवर काम करतात त्यांची गरीबी कमी झाली आहे. शेतीची उत्पादकता वाढविणे जमीन सपाटीकरण, जंगल सवंर्धन नविन पाणी निर्मिती अशी उत्पादक कामे नरेगातून करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य मजुरांकडे शिक्षण व तंत्रज्ञान नसल्याने त्यांच्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा कार्यक्रम सुरु करावा एसे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे यावेळी भाषण झाले. प्राचार्य वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य रसाळ यांनी परिषदेची भूमिका विषद केली. उपप्राचार्य प्रदिप दिघे यांनी आभार मानले.