लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर २० जूनला होणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना ते लोकसभेत गेले आहे. त्यामुळे पारंपारिक वर्चस्व असलेल्या या जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण राहील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले असून कार्यकर्त्यांंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
गेल्यावेळी नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढलेले प्राचार्य बबनराव तायवाडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिवाय शाहू- फुले- आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली असून काम सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या पदवीधर मतदारसंघाची यावेळेची निवडणूक तिरंगी लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश बघता असेच वातावरण राहिले तर पदवीधरमध्ये भाजपचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही भाजपने उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महापौर अनिल सोले यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे बोलले जात असले तरी सोले यांच्या शिवाय प्रबळ दावेदार म्हणून संजय भेंडे, संदीप जोशी, गिरीश व्यास आणि माजी आमदार अशोक मानकर यांच्याकडे बघितले जात आहे.
यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत लवकरच निर्णय होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी सांगत आहे.
नितीन गडकरींच्या वारसदाराचा शोध घेताना तरुण आणि युवकांच्या संपर्कात असलेल्या उमेदवाराच्या गळ्यात माळ टाकली जाईल, असे चित्र आहे. भाजपने संदीप जोशी यांच्याकडे निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी मतदारयाद्यांची चाचपणी आणि नोंदणीचे काम धडाक्यात सुरू केले. संदीप जोशी यांचेही नाव या शर्यतीत घेतले जात आहे.
सध्या मतदार नोंदणी प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यावर भर दिला जात असून भाजप समर्थित शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने नोंदणी प्रक्रियेची जबाबदारी गिरीश पांडव या तरुण नेत्याकडे सोपविली आहे. ही जागा भाजपकडून खेचून आणण्याचा निर्धार काँग्रेसने केला असून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. गेल्या निवडणुकीत बबनराव तायवाडे यांना काँग्रेसने समर्थन दिले होते. परंतु, नितीन गडकरी यांच्या प्रभावापुढे त्यांचा निभाव लागला नव्हता. दिवं. गंगाधरराव फडणवीस यांचे एकतर्फी वर्चस्व राहलेल्या मतदारसंघात त्यांच्यानंतर गडकरींनी १९८८, १९९०, १९९६, २००२ आणि २००८ अशी पाचवेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.
२००८ सालच्या निवडणुकीत ९५ हजार ५८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५२ हजार ७६१ मते गडकरींनी घेतली होती. बबनरावांना २८ हजार ८३६ मते मिळाली होती. नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्य़ांमधील पदवीधरांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार असल्यामुळे तिन्ही राजकीय पक्षाची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे.