विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे महापौर अनिल सोले यांचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आले. भारतीय जनता पक्ष प्रदेश निवडणूक समितीने प्रा. सोले यांच्या नावाची घोषणा गुरुवारी सायंकाळी  केली. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रा. बबन तायवाडे, भाजपकडून अनिल सोले आणि शाहू- फुले- आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष, समता समाज संघाचे संघप्रमुख सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर २० जूनला होणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असताना ते लोकसभेवर निवडून गेले, त्यामुळे पारंपरिक वर्चस्व असलेल्या मतदारसंघासाठी प्रा. अनिल सोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात २ लाखापेक्षा अधिक मतदार असून २७ मेपर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्यामुळे ती संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश बघता असेच वातावरण राहिले तर पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. अनिल सोले हे महापौर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपायला अजून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
दिवंगत गंगाधर फडणवीस यांचे एकतर्फी वर्चस्व राहिलेल्या मतदारसंघात त्यांच्यानंतर गडकरींनी १९८८, १९९०, १९९६, २००२ आणि २००८ अशी पाचवेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. २००८ सालच्या निवडणुकीत ९५ हजार ५८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५२ हजार ७६१ मते गडकरींनी घेतली होती. बबन तायवाडेंना २८ हजार ८३६ मते मिळाली होती. तायवाडे पुन्हा निवडणूक रिंगणात असून आता त्यांची लढाई मात्र अनिल सोले यांच्यासोबत आहे.  
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. अनिल सोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग, राष्ट्रीय नेते नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. भाजप नेहमीच कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणूक लढतो. हे लोकसभा निवडणुकीत दाखविले आहे, त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांंच्या भरवशावर लढणार असून ती जिंकणार आहे. नितीन गडकरी गेल्या २५ वर्षांंपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे ही जागा कायम राखणे आव्हान असल्यामुळे त्यासाठी कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालो असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी ही निवडणूक लढणार असल्याचे प्रा. सोले म्हणाले.