माहितीच्या अधिकारात गावात होत असलेल्या विकासकामांची माहिती मागितल्याचा राग येऊन सावरगाव पाट (ता. अकोले) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन सुदाम सहाणे या शेतक-यास बहिष्कृत केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सहाणे यांना ग्रामसभेस उपस्थित राहू दिले जात नाही तसेच गावातील सार्वजनिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहू दिले जात नाही. त्यांच्या कुटुंबायांनाही त्रास दिला जात असल्याची खळबळजनक तक्रार जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी या संदर्भात जिल्हाधिका-यांकडे आज लेखी तक्रार केली. जिल्हाधिका-यांनी या घटनेची चौकशी करण्याचे मान्य केले आहे.
हत्येचा निषेध करण्यासाठी तसेच प्रस्तावित जादूटोणाविरोधी कायद्यास दाभोलकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी जिल्ह्य़ातील विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, त्यात सहभागी होण्यासाठी रंजना पगार-गवांदे येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासह संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांचे या घटनेकडे लक्ष वेधले.
रंजना गवांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ठराव मागे घ्यावा यासाठी सहाणे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडे तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिका-याकडेही दाद मागितली, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. गटविकास अधिका-यांनी तर ग्रामपंचायतीचा निर्णय असल्याचे सांगत तक्रार स्वीकारण्यासही नकार दिला. दोन वर्षांपूर्वीच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव झाला आहे, त्याची प्रतही जिल्हाधिका-यांना देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले, की गावातील विकास कामे, सार्वजनिक अथवा खासगी तसेच विनाकारण खोटय़ा तक्रारी तसेच माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करुन सार्वजनिक कामांना खीळ घातली जात असल्याचे सांगण्यात आले, त्याप्रमाणे सुदाम सहाणे यांचे अर्ज कुठल्याही कार्यालयाने स्वीकारू नये, असे पत्र, निवेदन महसूल, जि. ग्रा. प्रशासन, पोलीस प्रशासनास देण्यात यावे, असे सर्वानुमते ठरले. सदर व्यक्ती जाणीवपूर्वक कामांना अडथळे आणून कामांना खीळ बसत असल्याने सदर उपद्रवी व्यक्तीवर गावातर्फे बहिष्कार घालण्याचे सर्वानुमते ठरले.
या ठरावास सूचक म्हणून कैलास गोविंद जाधव व रमेश दामोधर जाधव तरअनुमोदक म्हणून दिलीप मुरलीधर सहाणे यांची नावे आहेत. सरपंच व ग्रामसेवकाच्याही त्यावर स्वाक्ष-या आहेत.