निर्मल भारत अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायतींअंतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छताविषयक जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (दि. १५) होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामगीतेचे वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या निर्मल भारत अभियानअंतर्गत २०१३-१४ च्या वार्षकि कृती आराखडय़ात जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींअंतर्गत गावांमध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीच्या मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणाऱ्या ग्रामसभेत राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांच्या ग्रामगीतेतील स्वच्छतेचे महत्त्व विशद करणाऱ्या बाराव्या अध्यायाचे वाचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एम. व्ही. करडखेलकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पाणी व स्वच्छता समिती, शालेय व्यवस्थापन, तंटामुक्त समिती सदस्य, अंगणवाडी सेविका मदतनीस, गावातील प्रमुख व्यक्ती, महिला बचत गटांच्या सदस्या आदींनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या उपक्रमाचा अहवाल अभिप्रायासह जि.प. कार्यालयात तत्काळ सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.