छत्रपती शाहू मिलची जागा स्मारकासाठी शासनाने दिली असल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजी चौकामध्ये जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, किशोर घाटगे, विजय जाधव, मधुमती पावनगडकर यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.     
शाहू मिलची जागा शाहूंच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून भाजप व शिवसेना युतीच्या सर्व आमदारांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा केली, याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. या वेळी महेश जाधव म्हणाले, छत्रपती शाहूमहाराज म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचा आत्मा आहेत. शाहूमहाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला-क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा डोंगर उभा केला आहे.
शाहू मिलच्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहूंचे स्मारक उभारावे, की ज्यामध्ये शाहूमहाराजांनी केलेल्या संपूर्ण कार्याचा इतिहास त्यामध्ये दाखविण्यात यावा. स्मारकाची सुरुवात लवकरात लवकर सुरू करून चांगल्या दर्जाचे स्मारक बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी राहुल चिकोडे, अमोल पालोजी, संजय सावंत, संदीप देसाई, सुलभा मुजुमदार, डॉ. शेलार, संतोष कारंडे आदी उपस्थित होते.