पुण्याच्या महाविद्यालयीन युवकांची जान असलेली पुरुषोत्तम करंडक आंतर-महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा पुढील वर्षी मुंबई आणि नागपूर येथे धडक मारणार असून यावर्षी झालेल्या स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारपासून (१८ डिसेंबर) सुरू होणार आहे. महाअंतिम फेरीमध्ये पुण्यासह जळगाव, रत्नागिरी आणि कोल्हापूर येथील महाविद्यालयांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे पदाधिकारी राजन ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे ‘पुरुषोत्तम करंडक आंतर-महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. पूर्वी पुण्यापुरत्याच मर्यादित असलेल्या या स्पर्धेचा आता राज्यातील विविध विभागांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. प्रत्येक विभागात विजयी ठरलेल्या एकांकिकांची महाअंतिम फेरी घेण्यात येत असून यावर्षी महाअंतिम फेरीमध्ये एकूण १४ एकांकिका सादर करण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजी जैन उद्योग समूहाचे अभय जैन यांच्या हस्ते होणार आहे, तर पारितोषिक वितरण समारंभ २० डिसेंबर रोजी होणार आहे. या कालावधीमध्ये सकाळी ९ आणि सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये ह्य़ा एकांकिका पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
पुढील वर्ष हे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त दुसऱ्या भाषेतील नाटय़प्रयोग, नाटय़कार्यशाळा यांसारख्या विविध कार्यक्रमांचे महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष भव्य स्परूपात साजरे करण्यासाठी संस्था ‘मदतनिधी’ योजना राबवणार असून त्यासाठी अधिकाधिक लोकांनी मदत करावी असे आवाहन महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे करण्यात आले आहे.